सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने रायन रिकेल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर २० षटकांत पाच गडी गमावून २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादने १८.४ षटकांत २४९ धावा करून सामना जिंकला.
आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा धावांचा पाठलाग
ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा धावांचा पाठलाग पूर्ण केला. सनरायझर्सचा या हंगामातील हा सलग पाचवा विजय आहे. आपल्या नऊ सामन्यांपैकी सहा सामने जिंकून, हैदराबाद १२ गुणांसह आणि +०.८३२ च्या नेट रन रेटने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर सहा सामने गमावून मुंबई नवव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पंजाब किंग्सचे वर्चस्व असून, आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे.
हैदराबादचा डाव
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने सनरायझर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी ८.४ षटकांत १२९ धावा जोडल्या. अभिषेक २४ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि चार चौकारांसह ४५ धावा करून बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंमध्ये आठ षटकार आणि चार चौकारांसह ७६ धावा केल्या. १३३ धावांवर संघाची तिसरी विकेट पडली, त्यानंतर हेनरिक क्लासेनने नितीश रेड्डीसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंमध्ये ८० धावा जोडून संघाला २१३ धावांपर्यंत पोहोचवले. नितीश २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर क्लासेनने सलील अरोरासोबत १४ चेंडूंमध्ये नाबाद ३६ धावांची भागीदारी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. क्लासेन ३० चेंडूंमध्ये चार षटकार आणि सात चौकारांसह ६५ धावांवर नाबाद राहिला, तर सलील १० चेंडूंमध्ये तीन षटकार आणि दोन चौकारांसह ३० धावांवर नाबाद राहिला. विरोधी संघाकडून गझनफरने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
मुंबईचा डाव
यापूर्वी, विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन या सलामीच्या जोडीने ४३ चेंडूंमध्ये ९३ धावांची भागीदारी करून मुंबईला भक्कम सुरुवात करून दिली. जॅक्स २२ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि पाच चौकारांसह ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिकेल्टनने सूत्रे हाती घेतली. त्याने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी आठ चेंडूंमध्ये १७ धावा जोडल्या. सूर्यकुमार यादव पाच धावा करून बाद झाला. मुंबई इंडियन्सने ८.३ षटकांत ११० धावांवर दोन गडी गमावले. त्यानंतर रिकल्टनने नमन धीरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूंमध्ये ५५ धावांची भागीदारी करून संघाला बळकटी दिली. नमन १७ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह २२ धावा करून बाद झाला.
त्यानंतर, रिकल्टनने हार्दिक पांड्यासोबत २७ चेंडूंमध्ये ५६ धावा जोडून संघाचे द्विशतक पूर्ण केले. कर्णधार पांड्या १५ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तितक्याच चौकारांसह ३१ धावा करून बाद झाला. रायन रिकल्टन १० चौकार आणि आठ षटकारांसह ५५ चेंडूंमध्ये १२३ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने निर्धारित षटकांमध्ये पाच गडी गमावून २४३ धावा केल्या. विरोधी संघाकडून प्रफुल्ल हिंगेने सर्वाधिक दोन बळी घेतले. याव्यतिरिक्त, ईशान मलिंगा, शकिब हुसेन आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.
रायन रिकल्टनचा झंझावात व्यर्थ
मुंबई इंडियन्सचा स्टार सलामीवीर रायन रिकल्टनने बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकावत एक मोठा टप्पा गाठला. केवळ ४४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला.
मुंबईसाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज
बुधवारी, मुंबईचा सलामीवीर रायन रिकेल्टनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या ४४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. रिकेल्टन हा मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत सनथ जयसूर्या संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. जयसूर्याने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर तिलक वर्माने आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध तितक्याच चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या यादीत कॅमेरॉन ग्रीन तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव (४९ चेंडू) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ४९ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
ईशान किशनच्या विक्रमाची बरोबरी
डावखुरा फलंदाज रिकल्टनने वानखेडे स्टेडियमवर एसआरएच विरुद्ध ५५ चेंडूंमध्ये नाबाद १२३ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. रिकल्टनने २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे मुंबई इंडियन्ससाठी संयुक्तपणे सातवे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद आयपीएल अर्धशतकाचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे, ज्याने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या १६ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. यापूर्वी, रायन रिकल्टन याने २९ मार्च २०२६ रोजी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकविले होते.
रिकल्टनने केलेली मेहनत बघून वाटत होते की, या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या स्पर्धेत मुंबईचे आव्हान जीवंत राहिल. मात्र हैद्राबादी फलंदाजांनी मुंबईच्या आशा -आकांक्षावर अक्षरशः पाणी फेरले. या पराभवाबरोबर मुंबईच्या पुढील आशांना मोठा सुरूंग लागला असे म्हंटले तर वावगे ठरू नये. मात्र मुंबईवरील धडाकेबाज विजयाने सनरायझर्सच्या प्ले ऑफ अशांना मोठा बहार आला आहे.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

