shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझंही मत*;*निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार होती. मात्र मी राज्यसभेत जातो पण माझ्या रिकाम्या जागी माझा पुतण्या समीर भुजबळ याला आमदार करून राज्य मंत्रिमंडळात मंत्री देखील करा अशी अट भुजबळांनी घातली. त्यामुळे गाडी बिचकली आणि भुजबळांच्या जागी गोंदियाचे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे.

झाल्या प्रकाराबद्दल छगन भुजबळ यांनी काल माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आणि त्याचबरोबर अजित पवार, सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांना एक न्याय, मग माझ्या कुटुंबाला वेगळा न्याय का? असा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. 

वस्तूतः भुजबळांनी अशी अट घालणे योग्य होते काय याचे उत्तर सामान्य माणूस नकारार्थीच देईल. भुजबळ १९९३ पासून सत्तेत मंत्री आहेत. कधी कॅबिनेट मंत्री, तर कधी विरोधी पक्षनेते, तर कधी विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांचा मान कायम राहिलेला आहे. त्यापेक्षाही अधिक काळापासून ते आमदार राहिलेले आहेत. त्यांना ही दीर्घकालीन संधी मिळाली, त्याला कारण त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. आज त्यांना मुंबई असो, किंवा नाशिक दोन्ही ठिकाणी पुरेसा जनाधार आहे. त्यामुळेच ते निवडून येतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ओबीसी समाज मोठ्या संख्येत त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळेच त्यांना दरवेळी संधी दिली जाते. 

मात्र त्यांचा मुलगा पंकज किंवा पुतण्या समीर यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे काय याचे उत्तर नकारार्थीच मिळते. भुजबळांच्या कृपेने पंकज आणि समीर, त्यातील पंकज काही काळ आमदार तर समीर काही काळ खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र तिथे सभागृहात ते स्वतःची क्षमता फारशी सिद्ध करू शकले नव्हते. आज त्यांच्या बाजूला असलेले छगन भुजबळांचे वलय वजा केले तर स्वबळावर निवडून येण्याची क्षमता अजून तरी त्यांनी सिद्ध केलेली नाही. त्यामुळे त्यांना आमदारकी आणि मंत्रीपद दिलेच पाहिजे हा भुजबळांचा हट्ट काहीसा अनाठायी वाटतो. सकृतदर्शनी तरी हा राजकीय घराणेशाहीचाच प्रकार दिसतो. 

भारतीय राजकारणात या घराणेशाहीनेच चांगलेच थैमान घातलेले आहे. त्यामुळेच पंडित नेहरू नंतर कसेही करून त्यांची मुलगी इंदिरा गांधी हिलाच पंतप्रधान केले पाहिजे, हा त्यांच्या कुटुंबीयांचा हट्ट होताच. तो अवघ्या दोन वर्षात त्यांनी पूर्ण करून घेतला. इंदिरा गांधी नंतर काँग्रेस पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही त्यांना बाजूला सारण राजीव गांधींना पंतप्रधान केले गेले होते. आता राहुल गांधी देखील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलेच आहेत. 

फक्त नेहरू गांधी घराण्याचे नाही, तर इतरही कुटुंबांमध्ये ते प्रकार दिसून येतात. लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री असताना तुरुंगात गेले, तेव्हा त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री केले होते. नंतर त्यांनी आपला मुलगा तेजस्वी यादव यालाही राजकारणात पुढे आणले होते. मुलायमसिंह यादव यांनीही परिवारवाद जोपासलाच होता. शरद पवार देखील सुप्रिया सुळेंना पुढे आणण्यासाठी या वयात देखील जमेल तेवढी ताकद लावता आहेतच. 

इथे नेहरू लालूप्रसाद किंवा मुलायमसिंह हे खरोखरी सक्षम नेते होते. मात्र त्यांचे राजकीय वारस तितके सक्षम होते का याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. त्यांनी आपली सक्षमता सिद्ध करावी यासाठी त्यांच्या वाडवडीलांनी त्यांना संधी द्यायला हवी होती. मात्र ती संधी न देताच फक्त मोठ्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणून त्यांना पदावर बसवले गेले आणि जनसामान्यांना त्यांच्या मागे मेंढरासारखे जायला भाग पाडले गेले. महाराष्ट्रात बोलायचे झाल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खरोखरी ताकदीचे नेते होते. मात्र ती ताकद उद्धव ठाकरेंनी दाखवली का आणि आता तीच ताकद पुढे आदित्य ठाकरे तरी दाखवू शकणार आहेत का? मात्र तरीही फक्त ठाकरे परिवार म्हणून सगळ्यांनी त्यांच्या मागे लोटांगण घालत जायचे,  हाच प्रकार इथे होतो आहे. मुंडे परिवारात सुद्धा आधी धनंजय ला पुढे आणले मग पंकजा आणि मग प्रीतम हे सर्व गोपीनाथजींच्या छायातीत पुढे आणले गेले होते. त्यांना त्यांची सक्षमता सिद्ध करून मग निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची परवानगी दिली होती का? तर नाही. फक्त वडिलांचे वलय त्या जोरावरच हे सत्ताधीश झाले आणि जनसामान्यांना आपल्यासमोर लोटांगण घालायला लावले. शरद पवार देखील सुप्रिया सुळे यांच्याबाबत तेच करत आहेत. 

छगन भुजबळांना समीरसाठी संधी नाकारली म्हणून त्यांनी सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांच्या कुटुंबातला घराणेशाहीचा उल्लेख केला आहे. तो कुठेही चुकीचा नाही. सुनील तटकरे यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र आदिती तटकरे किंवा आता अनिकेत तटकरे यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे काय? ते जर सुनील तटकरेंचे वलय बाजूला ठेवले तर निवडून येऊ शकतील काय याचे उत्तर नकारार्थीच मिळते. 

या राजकीय घराणेशाही मुळेच बरेचदा लोकशाहीत चांगले जनाधार असणारे नेते बाजूला पडतात. आणि अनेकदा मग एकाच कुटुंबाच्या हातात पिढ्यानपिढ्या सत्ता केंद्रित केली जात असते. हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. जर वडिलांनंतर काही काळाने मुलगा आपली क्षमता सिद्ध करून पुढे आला तर जरूर त्याला पक्षाने पद द्यावे. इथे उदाहरण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देता येईल. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जुन्या जनसंघाचे आणि नंतर भाजपचे खंदे कार्यकर्ते होते. ते पदवीधर मतदारसंघातून निवडून येत होते. गंगाधरराव वारले तेव्हा देवेंद्र फडणवीस अठरा वर्षाचे होते. त्यावेळी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर त्यांनी आधी नगरसेवक मग आमदार मग प्रदेश सरचिटणीस मग प्रदेशाध्यक्ष आणि नंतर मुख्यमंत्री असे टप्पे गाठत स्वतःला सिद्ध केले आहे. या प्रकाराने जर कोणी आपली क्षमता सिद्ध करून पुढे येणार असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र राजकीय घराणेशाही म्हणून वडिलांनी मुलाला किंवा मुलीला आपल्या हयातीतच प्रतिष्ठित करण्याचे प्रकार हे चुकीचेच आहेत. ते सकस लोकशाहीला घातक ठरणारे आहे. 

अनेकदा एखाद्या नेत्याचे पदावर असतानाच निधन झाले तर सहानुभूती मिळविण्यासाठी मग त्याची विधवा पत्नी किंवा त्याचा मुलगा किंवा मुलगी यांना उमेदवारी दिली जाते. मतदारही सहानुभूतीच्या लाटेत त्यांची क्षमता न पाहताच त्यांना निवडून आणतात. अशावेळी मग लायक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो. मात्र याचा विचार कोणीच करत नाही. 

हे सर्वच प्रकार कुठेतरी थांबायलाच हवेत. वस्तुतः एका व्यक्तीने शासकीय पद किती काळ अडकवून ठेवावे याबाबतही काही नियम व्हायला हवेत. काही लोक दहा, दहा वेळा विधानसभेत किंवा लोकसभेत निवडून जातात. त्या पन्नास वर्षाच्या काळात ते त्या मतदारसंघातल्या अनेक सक्षम कार्यकर्त्यांची संधी डावलत असतात. अर्थात याला काही सन्माननीय अपवादही असतात. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे अर्जुनराव वानखेडे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तिसऱ्या वेळी ते स्वतःहूनच बाजूला झाले आणि त्यांचे निष्ठावंत सहकारी किसनलाल संचेती यांना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांनी पक्षाकडे आग्रह धरला. मग किसनलालजींना उमेदवारी दिली गेली आणि ते विजयी झाले होते. असा मनाचा मोठेपणा प्रत्येक नेत्याने दाखवायला हवा. तो दाखवणार नसेल तर त्याबाबत कायदाच केला जायला हवा. तरच आपल्या देशातील लोकशाहीला चांगले वळण लागू शकेल. अन्यथा लोकशाहीच्या आडून घराणेशाहीच जोपासली जाणार हे निश्चित आहे. 

अर्थात हे माझे मत झाले........
 तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्हीही मांडू शकता.....त्याचे स्वागतच होईल.
close