आहार, शालेय साहित्य व विविध खर्चाच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी; मोहन शेगर यांचा आदिवासी विकास आयुक्तांकडे तक्रार अर्ज
सोनई : नाशिक जिल्ह्यातील सहा शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासह विविध शासकीय निधीच्या वापराबाबत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करून, या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार मोहन दादा शेगर यांनी आदिवासी विकास आयुक्तांकडे केली आहे.
माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त कागदपत्रांच्या आधारे काही नोंदी व खर्चाच्या बाबींमध्ये संशयास्पद तफावत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून उपलब्ध होणारा निधी, त्याचा प्रत्यक्ष वापर, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण व गुणवत्ता यांची नियमानुसार पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीत धोंडबार (ता. सिन्नर), बाडगी व आंबे (ता. पेठ), देवसाने व पिंपरखेड (ता. दिंडोरी) आणि शेणवड खुर्द (ता. इगतपुरी) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळांचा समावेश आहे.
आहाराशी संबंधित नोंदवह्या, अन्नधान्य व इतर साहित्याचा पुरवठा, खरेदी आदेश, संबंधित बिले, देयके, स्टॉक रजिस्टर तसेच पुरवठादार व कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी शेगर यांनी केली आहे.
याशिवाय स्टेशनरी, पाणी फिल्टर, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य आणि इतर खरेदीच्या बिलांची तपासणी करून प्रत्यक्ष खरेदी व वापराची नोंद यामध्ये तफावत आहे का, याची स्थळपाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांशी संबंधित नोंदी, विविध शासकीय नोंदवह्या आणि अभिलेखांचीही नियमानुसार तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध सुविधा यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, कर्मचारी, पुरवठादार अथवा इतर जबाबदार व्यक्तींची भूमिका चौकशीत निष्पन्न झाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही शेगर यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून त्याचा अहवाल संबंधितांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मुदत आंदोलन करण्याचा इशारा मोहन शेगर यांनी दिला असून, आंदोलनाची पुढील जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची :
या तक्रारीतील आरोपांची अद्याप अधिकृत चौकशी पूर्ण झालेली नसल्याने त्यातील बाबींची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. संबंधित आश्रमशाळा प्रशासन व आदिवासी विकास विभागाची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
000

