shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

दिवाळी तोंडावर, इंदापूरच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापाऱ्यांचा हिरमोड!दुकाने मालाने सजली, मात्र खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी नाही; दुष्काळ, आर्थिक टंचाई आणि शेतमालाला कमी दराचा बाजारपेठेवर परिणाम

दिवाळी तोंडावर, इंदापूरच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापाऱ्यांचा हिरमोड!

दुकाने मालाने सजली, मात्र खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी नाही; दुष्काळ, आर्थिक टंचाई आणि शेतमालाला कमी दराचा बाजारपेठेवर परिणाम
इंदापूर : प्रतिनिधी

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज झाली आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी कपडे, किराणा, मिठाई, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, फटाके आदी विविध वस्तूंनी आपली दुकाने भरून ठेवली आहेत. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही बाजारपेठेत अपेक्षित ग्राहकांची वर्दळ दिसून येत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. ग्रामीण भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी शहरात येत असतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेजीत असतो. यंदा मात्र बाजारपेठेत दुकाने आकर्षक पद्धतीने सजवून, मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून ठेवली असतानाही ग्राहकांची पावले दुकानांकडे वळताना दिसत नाहीत.

यंदा दुष्काळी परिस्थितीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची पिके करपली असून, केळी आणि पेरू उत्पादक शेतकऱ्यांनाही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत हातात न पडल्याने त्यांच्याही हातात पैसा उपलब्ध नाही. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या हातातील पैसा कमी झाला आहे.

शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक अडचणींचा थेट परिणाम शहरातील बाजारपेठेवर होताना दिसत आहे. दिवाळीच्या सणासाठी नवीन कपडे, घरगुती वस्तू, मिठाई आणि इतर साहित्य खरेदी करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना खर्चावर मर्यादा आणाव्या लागत आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने माल भरून ठेवला आहे. मात्र, ग्राहकांची प्रतीक्षा कायम असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी दिवसांत तरी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढेल आणि दिवाळीचा व्यवसाय चांगला होईल, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

एकूणच, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे आणि याचा परिणाम इंदापूरच्या दिवाळी बाजारपेठेवर स्पष्टपणे जाणवत आहे. दिवाळीचा सण आनंदाचा असला, तरी यंदा आर्थिक संकटाच्या सावटाखाली व्यापारी आणि शेतकरी दोघेही चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.
close