व्याहाळी शाळेचे शिक्षक संतोष हेगडे यांची महाराष्ट्र राज्य आयडॉल टीचर म्हणून निवड
इंदापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकाचा राज्यस्तरावर गौरव; विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
व्याहाळी (ता. इंदापूर) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्रातील उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्नशील आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची महाराष्ट्र राज्य आयडॉल टीचर म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथे कार्यरत असलेले उपशिक्षक श्री. संतोष भगवान हेगडे यांची आयडॉल टीचर म्हणून निवड झाली आहे.
शिक्षण क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हेगडे गुरुजी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शिक्षण देण्याच्या त्यांच्या कार्याची या निवडीच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
व्याहाळी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये हेगडे गुरुजींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या या यशामुळे व्याहाळी गावासह इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यस्तरावर झालेल्या या निवडीबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून संतोष हेगडे गुरुजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षक वर्गाला प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही त्यांच्या हातून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
उपक्रमशील शिक्षक म्हणून राज्यस्तरावर मिळालेला हा सन्मान व्याहाळी शाळेसाठी आणि इंदापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

