गडचिरोली ता.१९ :- मागील काही दिवसापासून गडचिरोली शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शहरात २३ ते ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटना, नगर परिषद , गडचिरोली प्रशासन व सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.
शहरातील व्यापारी संघटना, नगर परिषदेचे अधिकारी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज विश्रामगृहात पार पडली. यात गडचिरोली शहर पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शहरातील सर्व दवाखाने व मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत. जनता कर्फ्यूला सर्व जनतेने सहकार्य करून यशस्वी करावे असे आव्हान बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ चन्नावार, उपाध्यक्ष हरीशजी राठी, दिलीपभाऊ सारडा , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर, शिवसेनेचे नेते नंदूभाऊ कुमुरे, भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्र्वरजी काटवे, काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, नगरसेवक केशव निंबोळ, गडचिरोली पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक सतीशजी विधाते, भाजीपाला व फळे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पुप्पलवार, सचिव भोजराज खोडवे, उपाध्यक्ष अजरुद्दीन शेख, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव रोशन कवाडकर, हेमंतजी राठी, प्रफुल बिजवे यांचेसह शहरातील व्यापारी दुकानदार उपस्थित होते.

