आयपीएलच तेरावे सत्र आता कुठे रंगात येऊ लागले आहे. आता पर्यंत झालेल्या १७ दिवसांच्या १९ सामन्यात युएईतील शारजा, दुबई व अबुधाबी येथील तीनही मैदानावर थोडाफार फरक सोडला तर जगभरातील नामांकित गोलंदाजांना चोप पडला आहे. यात फिरकी व वेगवान या दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांचा समावेश असून प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदांजीवर भरपूर धावा निघाल्या असून यात एकच असा गोलंदाज आहे की, त्याने खेेळलेल्या चार सामन्यापैकी एकाही सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर चार षटकांच्या हप्त्यात १८ पेक्षा अधिक धावा निघाल्या नाहीत. तो गोलंदाज आहे या सत्रात प्रथमच दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ...!
अडीच वर्षापूर्वी भारतीय संघाकडून नियमितपणे खेळणारा अक्षरपटेल नंतर अज्ञातवासात गेला. उंचापुरा डावखुरा फिरकीपटू असलेल्या अक्षरला यंदाच आयपीएल सत्र अतिशय सुरेख जात असून त्याची गोलंदाजी नियंत्रीत व टप्प्यावर पडत असून विरोधी संघातील नामवंत फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर धावा काढण्यास धडपडत आहेत. तर दुसरीकडे नावाजलेले फिरकीपटू रविंद्र जडेजा, पीयूष चावला, सुुनिल नारायण, कुलदिप यादव, राशीद खान धावा देण्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा एडम झांपा दुखापतीने त्रस्त झाला आहे.
तर दुसरीकडे याच अक्षर पटेलने केवळ ४ सामन्यात खेळताना १४ षटकांच्या गोलंदाजीत ( ८४ चेंडूत ) केवळ ४.५७ च्या सरासरीने केवळ ६४ धावा देत ४ बळी मिळविले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या तेराव्या सत्रात अक्षर पटेलने धावा देताना अतिशय काटकसर दाखविताना अफगाणिस्तानच्या राशिद खानलाही मागे सोडले आहे.
सन रायझर्स हैद्राबाद कडून खेळणा या राशिदखानने या सत्रात खेळलेल्या पाच सामन्यात २० षटकांची गोलंदाजी करताना ५.२० च्या सरासरीने १०४ धावा दिल्या असून धावा देणाऱ्या सर्वात कंजूष गोलंदाजात त्याचा विसरा क्रमांक असून दुसऱ्या स्थानावर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू कडून खेळणारा डावखुरा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ! वॉशिग्टनने अतिशय सुंदर व कसून गोलंदाजी करताना १५ षटकांत ४.८० च्या सरासरीने फक्त ७२ धावा खर्च केल्या आहेत.
या चालू आयपीएल सत्रात फिरकी गोलंदाजांंच्या तुलनेत धावा देण्यात वेगवान गोलंदाज महागडे ठरत असतना फिरकी गोलंदाज संतुलित मारा करत आहेत. तरीही काही नावाजलेले फिरकीपटू इतर नवख्या गोलंदाजांच्या तुलनेत महाग ठरत आहेत. त्यापैकी सीएसकेचा रवींद्र जडेजाने ९.५५ च्या सरासरीने धावांची खिरापत वाटली आहे. तर सीएसकेेचाच दुसरा फिरकीपटू पियुष चावलाने ८.८८, केकेआरच्या सुनिल नारायणने ८.५० व केकेआरच्याच कुलदिप यादवने प्रतिषटक ८.२२ धावा खर्च केल्या आहेत. तर आरसीबीचा यजुवेंद्र चहल ७.५७, दिल्लीचा आर. आश्विन ७.७१ व अमित मिश्रा ७.२० धावा दर षटका मागे देत आहेे. आता तर अमित मिश्रा दुखापतीमुळे या सत्रातून बाहेर पडला आहे. त्यामुळे अक्षरवर अतिरिक्त दबाव पडण्याची शक्यता आहे.
सन २०१४ मध्ये आयपीएल खेळण्यास सुरुवात करणाऱ्या अक्षर पटेलला स्वतःचं पदार्पणाचं सत्र अतिशय भारी गेलं होतं. त्यामध्ये त्याने १७ सामन्यात ६.१३च्या सरासरीने १७ बळी मिळविले होते.
अक्षर या सत्रात अतिशय वैविध्यपूर्ण मारा करत आहे. सोमवारी आरसीबीविरूध्द पॉवर प्लेमध्ये त्याने स्वतःच्या स्वभावाच्या विपरीत अतिशय मंदगती मारा करून अरोन फिंचचा मामा बनविला. आपला सहकारी व अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनच्या मदतीने तो नेट मध्ये कॅरम बॉल टाकण्याची कलाही विकसीत करीत आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

