पूर्णा । सय्यद कलीम: -
कोविड -१९  विषाणुमुळे मृत्यु झालेल्या नातेवाईकाचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकास अंत्यविधीसाठी हस्तांतरीत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी याबाबतचे आदेश आज बुधवारी (दि.१६) काढले आहेत. आदेशात म्हटले आहे की, राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हीड १ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९ ७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड १ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . त्या अन्वये जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ( कोव्हीड १ ९ ) नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 

तसेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून कोविड -१९ कोरोना विषाणू संसर्गाने मयत नागरिकांच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या व्यक्तीचे मृतदेह नातेवाईकाकडे सुपुर्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

त्यानुसार  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षा आंचल गोयल यांनी  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा १८ ९ ७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अधिन राहून हे आदेश काढले आहेत. 

परभणी जिल्हयातील कोव्हीड -१ ९ कोरोना विषाणू संसर्गाने मयत नागरिकांच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यासाठी मयत व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकाकडे सुपुर्द करण्याबाबत याव्दारे आदेशीत करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिका क्षेत्रासाठी आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका व महानगरपालिका क्षेत्र वगळुन नगरपालीका / नगर पंचायतीसाठी संबंधित मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांची असेल. 

या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यपस्थान कायदा २००५ साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ तसेच भारतीय दंड विधान १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाईस पात्र राहतील. या कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.