शिर्डी । प्रतिनिधी :-
श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी तथा साईबाबा एम्प्लॉइज सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार यांच्यावर सुड भावनेतून कारवाई करत त्यांची सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे. ही कारवाई एकतर्फी असून ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवारी सकाळी साईसंस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, विश्वस्त महेंद्र शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे कार्यकर्ते विठ्ठल पवार हे साईसंस्थानचे कर्मचारी आहेत. त्यांची राजकीय सूडभावनेतून तत्कालीन कार्यकारी अधिकारी यांनी सफाई कामगार म्हणून बदली केली आहे. कोरोना काळात संस्थान कामगार हितासाठी लसीकरण राबविण्यात तसेच विमा संरक्षण यासाठी मागणी केली होती; परंतु याविषयी कोणतीही चौकशी न करता आकसापोटी अशी एकतर्फी कारवाई केली आहे. या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही व्हावी व न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगर, शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, जिल्हा संघटक विजय काळे, तालुका संघटक शिवाजीराजे चौधरी, उपतालुका प्रमुख पुंडलिक बावके, सुनील परदेशी, भानुदास कातोरे, दिनेश आरणे, आशिष गाडेकर, सोमनाथ गोरे, भास्कर मोटकर, बाबासाहेब चौधरी, दिनकर कडलग, कैलास बिहाणी, आबासाहेब नळे, राजेंद्र सिरसाट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एका महिन्यात याप्रकरणी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन संस्थानच्या विश्वस्तांनी दिले असल्याचे कुमठेकर यांनी सांगितले.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणी ८० टक्के समाजकारण या तत्वानुसार पवार यांच्यावर संस्थानकडून झालेल्या अन्यायाबाबत विश्वस्तांची भेट घेतली आहे. या प्रश्नावर योग्य निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर संवाद साधून शिवसेना स्टाईलने न्याय मिळवून देऊ. जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.
- उद्धव कुमठेकर, संपर्कप्रमुख,
शिवसेना शिर्डी विधानसभा
साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे व महेंद्र शेळके यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.

