*सरकारच्या स्थगिती धोरणामुळे विकासकामे रखडली - छगन भुजबळ


*पुढच्या पावसाळ्यापर्यंत मांजर पाड्याचे पाणी डोंगरगाव पर्यंत येणार - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

येवला : (उस्मानभाई शेख):
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्या माध्यमातून पुणेगाव डोंगरगाव पोहोच कालव्याच्या विस्तारीकरण व अस्तरिकरण करण्यात येणार आहे. हे काम पुढील पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात येणार असून पुढील पावसाळ्यात मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचून येवलेकरांची स्वप्नपूर्ती होईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला मतदारसंघातील सायगाव व आंबेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भारती पवार ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे,प्रकाश वाघ,मोहन शेलार, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, एकनाथ भालेराव,प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अशोक कुळधर, भाऊसाहेब आहेर,  गणपत कांदळकर, बाळासाहेब दाणे, प्रसाद पाटील, अर्चना गीते, रुपाली उशीर,शशिकांत गीते, आनंदा गीते, वाल्मीक आवटे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे  यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात सर्वात प्रथम पाणी पुरवठा आणि जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. मांजरपाडा सारखा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प साकार करण्यात आला असून १६२ किलोमिटरचा कालवा तयार करण्यात आला आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे यासाठी सुमारे १४९८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कालव्याचे विस्तारीकरण व अस्तारिकरण करण्यात येणार आहे. अनेक लोक पाणी येणारच नाही असा प्रचार करत होते. आता पाणी येतंय तर श्रेय घेण्यासाठी धडपड करताय असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

पुढे ते ते म्हणाले की, सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने निकषात बदल करून ६५ मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झालेल्या मात्र संततधार पाऊस होऊन परिसरातील नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 ते म्हणाले की, राज्यात विकासाच्या कामांना स्थगिती देणारे सरकार आहे. अद्याप अनेक कामांची स्थगिती उठविली नाही. त्यामुळे अनेक कामे रखडली आहे. आता  गणेशोत्सव, पुढे नवरात्र, दिवाळी झाल्यानंतर वेळ मिळाला की शासनाकडून स्थगिती उठवून कामे केली जातील असा चिमटा त्यांनी यावेळी त्यांनी काढला.
*या विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण*
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला मतदारसंघातील आंबेगांव येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, अनु. जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, मुलभूत सुविधा योजनेंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण करण्यात आले.

तसेच सायगांव येथे जलजीवन मिशन योजनेतर्गत पाणीपुरवठा योजना, स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता कॉक्रिटीकरण, तिर्थक्षेत्र योजनेंतर्गत रोकडोबा पारावरील सभामंडप, तलाठी कार्यालय-निवासस्थान इमारत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.तर जिल्हा क्रिडा योजना (जि.प) अंतर्गत व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.