बाबासाहेब यांचे चरित्र व त्यांनी
लिहिलेले ग्रंथ वाचण्याचे आवाहन
 
सातारा प्रतिनिधी:
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा आपण दररोज घेत असलो तरी भोवताली प्रत्यक्षात आपल्याला अनेक विषमता पहायला मिळतात. सामाजिक आणि आर्थिक विषमता मोठी आहे. अशा काळात परिस्थिती कशीही असो पण आयुष्यभर  शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि बंधुत्व जोपासले पाहिजे. शिक्षणाने माणूस डोळस होतो. शिक्षणाने चांगल्याच गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. वाईट गोष्टी न करता अधिकाधिक चांगले करण्यासाठी शिक्षण घ्यायचे असते. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर न्यायासाठी संघर्ष करावा लागला. त्यांचे विद्येवर अतिशय प्रेम होते. विविध प्रकारचे ग्रंथ त्यांनी वाचले होते. 


ज्यांना माणुसकी मिळाली नाही अशा उपेक्षित वर्गाच्या त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला. देशाच्या हितासाठी भारतीय संविधान निर्माण करण्यात त्यांनी अनमोल योगदान दिले. विषमता नाकारून आयुष्याच्या शेवटी त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या सारखे ज्ञानी ,शीलवान ,कष्टाळू,आणि समतावादी व्हावे असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख  व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील भाषा मंडळाचे प्रभारी संचालक ,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन व क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतीदिन कार्यक्रमात ते रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयातील विद्यार्थ्याशी कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात बोलत होते. बाबासाहेब यांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग सांगत व गीत सादर करीत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी उपमुख्याध्यापक श्री.डी.बी.खाडे, पर्यवेक्षक श्री. एस.व्ही .जाधव,व्ही.आर.शिंदे  प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे हे उपस्थित होते. प्राचार्य श्री.व्ही. आर. गुजले यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाबासाहेब यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की त्यांचे राहणीमान अतिशय चागले होते. आपल्या घरातच त्यांनी ग्रंथालय उभे केले. ते सत्यवादी होते.नीतिमान होते. ते वकील होते,समाजसुधारक होते.देशातील विषमता नष्ट करून समता आणण्यासाठी त्यांनी संविधानात अनेक तरतुदी केल्या.ईश्वर किंवा भुते यांना न मानता त्यांनी सदाचरण महत्वाचे मानणारा बुद्ध धम्म स्वीकारला. खोटे बोलू नये ,निर्व्यसनी रहावे, हिंसा करू नये ,विचार विनिमय करून प्रश्न सोडवावे ,व्यक्तिपूजा करू नये ,खूप परिश्रम घेऊन उच्च शिक्षण घ्यावे. स्वतःचे कल्याण करण्याबरोबर देशाचे चांगले करण्यासाठी योगदान द्यावे ही त्यांची भावना होती. ज्ञान हीच एक शक्ती आहे. पण तिचा उपयोग समाजहितकारी कामासाठी करावा म्हणून शीलवान व्हा असा त्यांचा संदेश होता. गौतम बुद्धांनी स्वतःचे दिवे स्वतः व्हा हा संदेश दिला, बाबासाहेबांनी स्वाभिमानी राहून आणि कष्टाने ,सदाचारी आचरणाने आपल्याला मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यानी काळानुसार स्वतःत बदल करावेत. दिवसातील २१ तास वाचन करून त्यांनी ज्ञान संपादन केले. स्वावलंबन व स्वाभिमान याला त्यांनी महत्व दिले. भारत एकसंध राहायला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. विद्या, प्रज्ञा ,करुणा ,शील ,आणि मैत्रीभावना या पाच गोष्टी घेऊन विद्यार्थ्यांने आपले चारित्र्य बनवले पाहिजे ,कोणताही माणूस सतत परिश्रम करीत राहिला तर तो पराक्रमी आणि बुद्धिमान होतो. अंधश्रद्धा,दैववादी राहणे त्यांनी नाकारले आणि ‘स्वावलंबी व्हा’ हा महत्वाचा संदेश दिला. गौतम बुद्ध ,महात्मा फुले,आणि संत कबीर यांना त्यांनी गुरु मानले. या तिन्ही गुरूंचे आचरण,ज्ञान आणि कार्य महान होते. आपल्या अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे प्रत्येक सुशिक्षितांचे कर्तव्य आहे असे ते म्हणत. विद्यार्थ्यांनी स्वतःला ज्ञानी बनवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व त्यांनी लिहिलेले विविध ग्रंथ वाचले पाहिजेत असे आवाहन प्रा.वाघमारे यांनी केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन करून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. बाबासाहेब आणि क्रांतिसिंह नाना पाटील,कर्मवीर अण्णा यांच्याविषयी आपण सदैव कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजाच्यापर्यंत पोहचवत राहिले पाहिजे असेही ते म्हणाले. या व कार्यक्रमात सुरवातीस श्रेया चावरे ,तनुजा कणसे ,प्रीती जाधव ,विघ्नेश  देशमुख ,आर्या साठे , सिद्धी माने नीला गेहलोत  या विद्यार्थ्यांनी भाषण करून त्यांचे विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्र संचालन श्री. ए.के. यादव यांनी केले. विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.

*वृत्तविशेष सहयोग
डॉ.बाबुराव उपाध्ये - श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111