लातूर / प्रतिनिधी :
            अतुलनीय व्यक्तीमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, चारित्र्याचा मापदंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. जगातल्या कोणत्याच व्यक्ती वा काल्पनिक पात्रांशी ज्यांची तुलनाच करता येऊ शकत नाही. असे एक आदर्श, प्रगल्भ नेतृत्व म्हणजे जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा या आदर्श नितीवंत राजाची जंयती दरवर्षी हर्षोल्लासाने साजरी करण्यात येते. त्याचेच औचित्य साधून  वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्ह्याच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजंयती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भटक्या-विमुक्तांचे नेते हरिभाऊ गायकवाड यांची उपस्थिती लाभली. त्याचसोबत अतिथी म्हणून बहुजन नेते भारत काळे, पद्माकर वाघमारे, रंगनाथ घोडके, ॲड.अंगदरावजी सूर्यवशी, सुदर्शन बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.   

            याप्रसंगी श्रीकांत मुद्दे म्हणाले की, ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो त्या समाजाच्या        विकासासाठी आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. यातूनच जबाबदारी आणि कर्तव्यभावनेतून समाजासाठी योगदान दिले पाहिजे. शिवछत्रपतींना           घडवणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, तरच समाजाच्या विकासाचा रथ पुढे जाण्यास मदत होईल, असेही यावेळी वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे म्हणाले.
            शिवकालीन इतिहास घडवण्यात वडार समाजाचेही मोलाचे योगदान राहिलेले आहे, याचे     पाऊलखुणा इतिहासाच्या पानापानावर आपणास दिसून येतात. मात्र वडार समाज इतिहासात कायमच बेदखल राहिलेला आहे, असेही यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतजी मुद्दे म्हणाले. वडार समाज संघ, लातूर जिल्ह्याच्या वतीने एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने लोकमान्य टिळक चौक येथे शिवजन्मोत्सव   साजरा करण्यात आला.याचे आयोजक वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य  लातूर जिल्हाध्यक्ष रमाकांत   मुद्दे यांच्या हस्ते सर्व शिवप्रेमींचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रमाकांत मुद्दे, दिपक सूर्यवंशी, कृष्णा धोत्रे,  कुणालजी वाघज, महेश गुंजाळ, पप्पू भांडेकर, गोविंद मुद्दे, दिलीप पिनाटे, ॲड.पांचाळ, सचिन वाडीकर, लखन मुद्दे,  आकाश धोत्रे  आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.