पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत, अनेकांचे पगार बुडालेत. मात्र गेल्या २ महिन्यांचा पगार अद्याप दिला नसल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांनी थेट कंपनीच्या फिल्ड ऑफिसरलाच शिवीगाळ करत दगडाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलेश तायडे यांनी हिंजवडी पोलीसांत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निलेश अशोक तायडे (वय ३६, रा. माणगाव, ता. मुळशी जि.पुणे) असे मारहाण झालेल्या फिल्ड ऑफीसरचे नाव आहे. तर कृष्णा रगडे, सावन साळुंखे, सुरज साळुंखे (तिघेही रा. दिघी पूर्ण पत्ता नाही) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा रगडे, सावन साळुंखे, सुरज साळुंखे हे तिघेही दिघी येथील पेरे ग्रीन ग्रेडिंग कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार त्यांना मिळाला नव्हता. हा पगार देण्याची प्रक्रिया कंपनीकडून चालू होती. मात्र कृष्णा राकडे यांनी शनिवार दि.२० रोजी कंपनीचे फील्ड ऑफिसर निलेश तायडे यांना फोन करून हिंजवडी येथील फेज वन सर्कल येथे पगारा संदर्भात बोलायचे आहे, असे सांगून भेटायला बोलावले. त्यानंतर निलेश तायडे व त्यांच्यासोबत अनिकेत होवाळ हे तेथे दि.२० रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गेले. त्यावेळी तीनही कर्मचाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता पगार पाहिजे असे म्हणून तायडे यांना शिवीगाळ करून मारण्यास सुरुवात केली. तायडे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच डोक्यात दगड मारून मारहाण केली. याप्रकरणी फिल्ड ऑफिसर निलेश तायडे यांनी हिंजवडी पोलिसांत या तीनही आरोपींच्या विरोधात तक्रार दिली आहे. आरोपींना अद्याप ताब्यात घेतले नसून पुढील तपास पोलीस हवालदार फडतरे करत आहेत.

