आयपीएलच्या तेराव्या सत्राच्या सहाव्या दिवशी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने आपली बादशाहात सिध्द करून कोहलीच्या विराट सेनेचे राज्य खालसा केले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना खास करून विराट कोहलीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा व गलथान नेतृत्वाचा पुरेपुर लाभ उठवत धावांचा पहाड उभा केला. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी व लयबद्ध क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आरसीबीवर स्पर्धेतला सर्वात मोठा विजय मिळविला.

भारतीय क्रिकेटचा नायक असलेला कोहली या सामन्यात आरसीबीच्या पराभवात खलनायक बनला. एक चपळ व तंदुरूस्त खेळाडू असं बिरूद असलेला विराट या सामन्यात खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात सफशेल अपयशी ठरला. तर नेतृत्व करताना आपल्या गोलंदाजांवरही नियंत्रण ठेऊ शकला नाही. संथ गोलंदाजी करण्याच्या आरोपावरून त्याला बारा लाख रुपयांचा दंडही झाला. दोन झेल सोडून राहुलवर मेहेरबान झाला व फलंदाजीत बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याने आरसीबीलाच सामन्यातून बाद केले.

दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सुपर ओव्हर मधील पराभवाच्या धक्क्यातून सावरत बलवान आरसीबीला पराभवाचा डोस पाजून पंजाबने आपले खेळातील सातत्य राखत विजय अभियान सुरू केले. पंजाबच्या विजयात चमकदार कामगिरी करणाऱ्या पंजाबी शेरांच्या जोरदार कामगिरीचा एक आढावा घेऊया.

आपला जवळचा मित्र कोहलीच्या विराट प्रेम प्रदर्शनानंतर झंझावाती शतक ठोकण्यात यशस्वी ठरलेल्या पंजाबचा सलामीवीर व कर्णधार लोकेश राहुलने केवळ ६९ चेंडूत १३२ धावांचा पाऊस पाडत १४ चौकार व ७ षटकारांची उधळण केली व आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांची शतकी खेळी करणारा कर्णधार बनला. राहुलने पंजाबचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर प्रथमच शतकी खेळी करत सामन्यात फलंदाजाला मिळणारे सगळे बक्षिसं पटकविले.

१९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपली पहिलीच आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या २० वर्षीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने स्वतःच्या दुसऱ्या आयपीएल सामन्यातच आरोन फिंच, वॉशिंग्टन सुंदर व उमेश यादव या तिघांना डग आऊट मध्ये पिटाळले व कोहलीसह दोन फलंदाजांचे झेल घेऊन आपल्यातील कलागुणांची चुणूक दाखविली.

या आयपीएल सत्रातील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मुुरुगन आश्विन या फिरकी गोलंदाजानेही आपल्या फिरकीच्या चक्रात आरसीबीच्याा फलंदाजांना घेरले. त्या तीन षटकांचीी गोलंदाजी करताना २१ धावांचे मोल मोजून खतरनाक एबी डिव्हीलर्स, नवदीप सैनी व यजुवेंद्र चहल यांचे बळी टिपले.

वेस्ट इंडिजमधील जमैकन पोलिसात नोकरीला असलेल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने आपल्या मजबूत खांद्यांचा पूरेपूर उपयोग करत आखूड टप्प्याचे चेंडू टाकून सलामीवीर देवदत्त पडीक्कल व कर्णधार विराट कोहली यांना बाद करून आरसीबीचे कंबरडे मोडताना तीन षटकात केवळ १७ धावा देत कंजुषपणा दाखविला.

पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुध्द ८० धावांची जोरदार खेळी करणारा सलामीवीर मयंक अग्रवाल या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही परंतु २० चेंडूत २६ धावांची छोटेखानी खेळी करताना कर्णधार केएल राहुल सोबत केलेली ५७ धावांची मजबूत पायाभरणी पंजाबच्या मोठ्या धावसंख्येसाठी महत्वाची ठरली. 

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com