प्रतिनिधी । राजेश बाष्टे :
अलिबाग ;- अनुदान जाहीर करण्याची मागणी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाजाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून राज्यातील कुंभार समाज उद्ध्वस्त झाला आहे . यामुळे शासनाच्या पुनर्वसन विभागामार्फत या समाजाच्या नुकसानीचे पंचनामे करून कुंभार समाजाला तातडीने मदत करावी , अशी मागणी कुंभार समाज संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांनी केली . दरेकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे .
कुंभार समाजाचे राज्यातील ७५ लाख लोकसंख्येपैकी २० लाखापेक्षा अधिक लोक आपली पिढीजात पारंपरिक कला जोपासून आपला उदरनिर्वाह करत आहेत . आजवर या समाजाने कितीही संकटे आली तरी शासनाकडे मदतीसाठी हात पसरले नाहीत . मात्र , कोरोनामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे . या काळात कुंभार समाजाला मातीचे माठ , रांजण , अक्षयतृतियेचे कुंभ विक्री करता आली नाही . गणेशोत्सवाच्या काळात कुंभार समाज आपले वर्षभराचे आर्थिक नियोजन करतो . मात्र , कोरोनामुळे व गणेशोत्सवाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कुंभार समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले .
कोकणपट्ट्यात चक्रीवादळामुळे मच्छीमारी करता न आल्याने कोळी समाजाला महाराष्ट्र शासनाने ६५ कोटी १७ लाख रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले आहे . वाहतूक व्यावसायिकांना वाहन कर माफ केला आहे . त्याच धर्तीवर शासनाने कुंभार समाजालाही तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करावे . तसेच तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करावे , अशी मागणी सतीश दरेकर यांनी निवेदनात केलीय ..

