इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
भिगवण दिनांक २७/०९/२०२० रोजी धनगर समाज ऐक्य परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीचे वर्गातआरक्षण मिळविण्यासाठी  भिगवण या ठिकाणी सकल धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक  आज संपन्न झाली. यावेळी राज्याचे माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह सर्वच आजी-माजी पदाधिकारी मान्यवर  शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते


धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण घटनेत असूनही त्याची अंमलबजावणी 1956 साला पासूनही होत नाही.यामुळे आज राज्यव्यापी बैठकीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.  सर्वपक्षीय धनगर समाज या बैठकीमध्ये सहभागी झाला होता. शेकडोंच्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित असल्यामुळे प्रत्येकाने आप आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये पुढील दिशा ठरवून आंदोलन करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.धनगर ऐक्य परिषदेच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी याच बरोबर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या 22 सवलती तात्काळ लागू कराव्यात आणि मेंढपाळ बांधवांवरील हल्ले थांबवण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या या परिषदेमध्ये एक मुखाने संमत करण्यात आल्या.

पुढील आठ दिवसांमध्ये राज्यात तीव्र आंदोलन उभा करण्यात येणार असून त्याची सुरुवात आज परिषदेची सांगता करत असताना  सरकारने अनुसूचित जमातीच्या 22 सवलती अद्याप न दिल्याची यादीची यावेळी होळी करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. या परिषदेमध्ये सर्वच धनगर बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि आंदोलनाला सुरुवात करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.