एक सुंदर शहर होते, शहराच्या मध्यभागी एक संग्रहालय होते. त्या संग्रहालयाची संपूर्ण फरशी संगमरवरीने मडवली होती. आणि आतमध्ये शिरताच मध्यभागी संगमरवरीनेच बनवलेली एक सुंदर आकर्षक मोठी मूर्ती होती जी त्या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण होते. ही मूर्ती बघण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या देशांतून दररोज यायची. आणि त्या मूर्तीचे तोंडभरून स्तुती करायचे. एक दिवस रात्रीच्यावेळी जमिनीवर असलेली संगमरवरी फरशी त्या मुर्ती बरोबर बोलायला लागते.

"हे मूर्ती आपण दोघे एकाच शहरातून आलो आहोत, आपल्याला एकाच खाणीतून उचलले गेले, एकाच ट्रक मधून आणले गेले. एकाच मूर्तिकाराकडे आणले गेले पण ह्या संग्रहालयामध्ये अनेक देशांमधून वेगवेगळी लोक रोज येतात पण मला ते तुडवून जातात पण तुझी मात्र स्तुती करतात असं का?" हा अन्याय आहे माझ्यावर. तेंव्हा ती संगमरवरी मूर्ती उत्तर देते. माझी प्रिय मित्र फरशी, तुला आठवते का आपण दोघे एकाच शेजारी बसलो होतो.

जेंव्हा आपल्याला त्या मूर्तिकाराच्या कारखान्यामध्ये आणले होते तेंव्हा आपल्या दोघांचे मूळ रूप संगमरवरीच होते आणि तुला आठवते का? त्या मुर्तीकाराने आधी तुझी निवड केली होती आणि त्याने त्याच्या धारदार शस्त्राने तुला आकार देण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुला तो सुंदर मूर्तीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत होता पण तू त्याला थांबवलेस, तू त्याला सहाय्य केलं नाहीस. तेंव्हा जमिनीवरची फारशी म्हणते मला ते चांगलेच आठवते मला त्या मूर्तिकाराचा खूप राग आला होता अशा धारदार शस्त्रांचा तो माझ्यावर असा कसा वापर करू शकतो? मला किती वेदना होत होत्या, त्रास होत होता.

तेंव्हा ती मूर्ती म्हणते, बरोबर जेंव्हा त्याला समजले की तू वेदना सहन करू शकत नाही तेंव्हा त्याने तुला बाजूला ठेवले आणि मग त्याने माझ्यावर काम चालू केले. मला माहिती होते या जगात मला काहीतरी वेगळे करून दाखवायचे असेल तर मला त्रास सहन करावा लागेल, मला वेदना सहन कराव्या लागतील त्यामुळे त्याला थांबवण्याऐवजी मी त्या धारधार शस्त्रांच्या सगळ्या वेदना सहन केल्या. मित्रा ह्या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते, तू वेदनांमुळे अर्ध्यातच त्या मूर्तिकाराची साथ सोडलीस त्यामुळे तुला आयुष्यभर लोकांच्या पायाखालीच राहावे लागेल.

पण मी सुरुवातीला असंख्य वेदना सहन केल्यामुळे मला त्या मुर्तीकाराने आकर्षक रूप दिले. आणि आज सगळेच ह्याच रुपाला बघायला येतात. फरशील आपली चूक समजली होती आणि पश्चताप सुद्धा होत होता. मित्रांनो आपले आयुष्य सुद्धा त्या मूर्तिकारासारखे आहे. जे आपल्यामधून एक चांगली मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रश्न हा आहे की तुम्ही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट, प्रत्येक त्रास, प्रत्येक दुःख, प्रत्येक अपयश सहन करायला तयार आहात का? जेणेकरून तुमच्या आयुष्याची एक सुंदर मूर्ती घडेल. का तुम्ही घाबरून जाता, पळवाट काढता, आणि एक सामान्य फरशी बनून राहता? निर्णय तुमचा आहे. एक फरशी बनून रहाल तर हे जग पायाखाली तुडवेल. तेच एक सुंदर मूर्ती बनाल तर लोक तुमचा आदर करतील, सन्मान करतील. आणि तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्त्व बनाल. मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.