गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

गडचिरोली ता.२८:- देसाईगंज तालुक्यातील जुनी आरतोंडी या गावात सकाळी गावापासून जवळच असलेल्या नदीवर शोचास गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला केला. यात इसम गंभीर जखमी झाला. बंडू मुकुंदा कुथे(४५) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

गावापासून जवळच असलेल्या नदीवर बंडू कुथे सकाळी शौचास गेला होता. परत येताना वाघाने अचानक पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. यात बंडूच्या छातीला जबर दुखापत झाली तर डाव्या काखेला ही वाघाने ओरबडले आहे. 

हल्ला होताच बंडूने आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या कुत्र्याने वाघाला परतवून लावले. घटनास्थळी दोन वाघ होते. त्यांपैकी एक वाघ आधिच पळून गेला असे बंडू कुथे यांने सांगितले. त्यांच्यावर देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.