खरंतर कलाकार म्हटलं की, वेडेपणा हा आलाच, सुरवात त्याची घरापासूनच होते, लहानपणा पासूनच शाळेत हुशार, लिखाण, वाचनाची आवड, आणि शाळेत सुद्धा अव्वल. 
पण ग्रामीण भाग, गरीब परिस्थिती आणि त्यातल्या त्यात विदर्भातील म्हटल्यावर मग चित्रपट बनविण्याची साधी स्वप्न ही पाहण्याचं धाडस करणे म्हणजे जणू थेट क्रूर पाप करण्यासारखं मानलं जातं होतं...;अन आमचं म्हातारं ( आज्या ) लय खडूस उगीच जाणून बुजून  चार माणसात ओरडून म्हणायचे........." माणसानं ना ! उगीच उंटाच्या ऽऽऽ चा मुका घेऊ नये बे..."
              मा. श्री.रमेश पवार; दिग्दर्शक 

तरी सुद्धा शाळेत नाटकं असो, पथनाट्य असो, किंवा मग गणपती , नवरात्री उत्सवातील नाटकं करणे,  नाटकं लिहिणे असो, त्याचं सादरीकरण असो किंवा एखाद्या कलापथक सारखं नाट्य मंडळ असो अश्या गोष्टी लहानपणापासूनच करत आलो, कारण तो किडाच ना आपल्याला....!
एखाद्या नाटकाचं लिखाण करायचं म्हटलं किंवा त्याचं सादरीकरण करायचं म्हटल्यावर मुलगी तर हवीच ना..! तेव्हा 90 च्या दशकाचा काळ आणि त्यातल्या त्यात विदर्भातील ग्रामीण भाग म्हटल्यावर मुलींनी नाटकात काम करण्याचा विषयच नाही...!! 

मग काय आपल्याला आता त्याचा किडाच म्हणल्यावर , आणि आपणच नाटकाचं सर्वेसर्वा असल्यामुळे   एखाद्या नाटकाचं सादरीकरण करायचं झालं तर मग आपली शरीर यष्टी बी नाजूक म्हणल्यावर मुलीचा रोल मग माझ्याच नशिबी.... आता माझा आजोबा म्हंजी घरी मीठ भाकर खा, किंवा उपाशी राहा, आमच्या ढुंगणावर फाटक्या चड्डी नि त्यांना काही फरक नाही पडत, पण मी नाटकात मुलीचं पात्र केलं की त्याच नाक कापल्या सारखं व्हायचं म्हनं..

तरी मी नाटक करणं काय सोडलंच नाय कारण ....आपल्याला त्याचा किडा च ना ! 

रात्री नाटक करून घरी गेल्यावर फटके रात्रीच पडणार याची खात्री असायची पण मी पण लय शहाणा ना, त्याच्या च बाजखाली लपायचो. म्हंजी ते रात्रभर मला दुसरीकड शोधत, डोळे चोळत बिडीचं बंडल संपवायचे, अन मी मात्र त्याच्याच खाटाखाली निवांत झोप काढायचो.. 
सकाळ पर्यन्त राग शांत नाही व्हायचा पण मारायचा मूड नसून तो फक्त शिव्या देऊन शांत व्हायचा.. 
त्यांचा ठरलेला डायलॉग.. "तुला कुणी मुलगी देणार नाय, आन दिली तरी ती  तुझ्यासोबत नांदायची नाय! 
( आत्ता मला 8 वर्षांची मुलगी आहे तो विषय वेगळा) 

इथून सुरवात झाली ,आपन पठयांन मुंबई गाठली.....; बघता बघता दिवस जाऊ लागले आपण काय या क्षेत्रापासून दूर जातोय व्हय तवा, अहह विषयच नाही..कारण आपल्याला लय..... ना!

कला- समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपटाची स्थापना केली बघता बघता जगभरातल्या 72 देशातील लोकांपर्यंत या फिल्म फेस्टिव्हल ची चर्चा सुरू झाली..मराठी हिंदी तेलगू अश्या अनेक भाषेतील दिग्गज कलाकार मंडळी ची मांदियाळी च तयार झाली, 2016 पासून चित्रपटाच्या निर्मिती साठी धडपड सुरू झाली,
 " बात्तकु एक वास्तविकता" च्या प्रवासाला खरंतर 2016 ला सुरवात झाली... तुम्ही मोठा चित्रपट कराच म्हणून अनेक आपल्या सारखे कलाकार पाठीशी उभे राहिले, पण चित्रपट बनविणे काही कांदा पोहे बनविण्या एवढं सोपं नाही.... ह्याची खात्री आधीपासूनच होती, 

म्हणून मग विचार केला की मोठी फिल्म करण्याची रिस्क नको आधी आपली कल्पना आपण शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून मांडायला काय हरकत आहे...;  झाली तयारी सुरू 30 मिनिटांची फिल्म करण्यासाठी वर्षभर बारकाईने अभ्यास केला..मग लोकेशन असो, पात्र असो, त्याची मांडणी असो सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे मांडल्या आणि आम्हाला जश्या अपेक्षित होत्या तश्याच पडद्यावर दिसल्या.. अनेक ठिकाणाहून कौतुक, मान सन्मान पुरस्कार भरभरून मिळालं.. 2019 मध्ये परत चित्रपटाच्या निर्मितीसाठी जोमाने कामाला लागलो, या वेळेस नक्कीच होईल अशा अपेक्षेने सुरवात केली, आणि माझा वैयक्तिक काही गोष्टीची अशी अडचण निर्माण झाली की त्यावेळी थांबावच लागलं. ..! त्यातून बाहेर निघता निघता 2019 निघून गेला.. 

परत 2020 ची सुरवात झाली या वर्षी यातून मागे जाण्याचा विषयच नाही म्हणत मार्च मध्ये या गोष्टीची परत सुरवात झाली, सर्व गोष्टी सोडून देऊन ... 15 मार्च ला महाराष्ट्राचे पवित्र स्थान पंढरपूर येथे ऑडिशन घेऊन श्री गणेशाय केला....ऑडिशन आटोपून लगेच लोकेशन च्या शोधात मी आणि टीम ने नांदेड गाठलं.. 22 मार्च उगवलेला कोरोनाजीचा शिरकाव झाला , मोदी साहेबांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यु घोषित केला .. चला एक दिवस आराम करू आणि परत कामाला लागू म्हणून विचार केला होता पण....!

22 मार्च च्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मा. उद्धव साहेब आले आणि त्यांनी जे आपल्याला घरात बंद केलं तर पार सहा महिन्या साठी बंदच बंद,बंदच बंद, बंदच बंद सगळी धुवून पुसून पार समीकरणच बदलून गेली, 
पण सिनेमाचा पिच्छा सोडणाऱ्या पैकी आपण अहह......
पाच महिने घरात बसून तेवढच स्क्रिप्ट वर जोरदार काम केलं...; जसं त्यांनी बाहेर निघायला ढील दिली.. आपली पोरं परत कामाला लागली....अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अधिकारी बांधवांच्या फोन ची घंटी परत वाजविली,  दादा आत्ता तुम्ही ऑडिशन घेऊ शकता म्हटलं की लगेच परत सुरवात केली, 

मला वाटतं मार्च मधल्या आपल्या चित्रपटाच्या ऑडिशन नंतर महामंडळाची ऑडिशन साठी परवानगी देण्याची प्रक्रिया बंद झाली असावी, आणि सहा महिन्यानंतर आपल्याच चित्रपटापासूनच परवानगी देण्याला सुरवात झाली असावी बहुतेक... असा हा चित्रपट बनविण्याचा प्रवास सुरु केलाय , त्यातल्या त्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद, प्रेम अफाट ऊर्जा देऊन जातं आणि माझ्या मातीतील कलाकारांसाठी काहीतरी करण्याची धडपड कायम चालू राहते, आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कलाकृती आपल्या सर्वांना भेट करतो....असाच आपला आशीर्वाद कायम पाठी असुद्या....

कोरोना फक्त कामात व्यत्यय आणू शकतो, समस्या निर्माण करू शकतो.पण माझ्या इच्छाशक्ती ला कमी नाही करू शकत.....चित्रपट तर होणारच..
कारण आपल्याला तर त्याचा लय........ ना!!!
जास्त हिग्लिस येत नाय पण एवढं बाकी घोटून घोटून पक्क डोक्यात ठेवलंय,

Every Successful Person Has a Painful Story, and Every Painful Story Has a Successful End So Accept the Pain and Get Ready For Success..

आपलं सहकार्य, प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे, ऋणी आहे..
हे कायम असच राहू द्या! 
आपल्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा कधीच भंग होणार नाहीत हे वचन आहे..

आपलाच.
रमेश पवार
9930441312