इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील लक्ष्मण डोईफोडे सुपुत्रास आसाम मध्ये वीरमरण
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे लक्ष्मण सतु डोईफोडे ( वय ४५ वर्षे ) हे आसाम राज्यात कर्तव्यावर असताना दि.२३फेब्रुवारी रोजी शहीद झाले आहेत.
सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून आपल्या पदावर कार्यरत होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
वीर मरण आलेले लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. डोईफोडे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे बोराटवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ डोईफोडे परिवाराच्या दुःखात सामील असून या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील युवक ,नागरिक, मित्र परिवार मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पार्थिव बोराटवाडी येथे आणण्यात येणार असून सकाळी ९.०० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.