वीजबिल थकबाकी वसुली प्रकरण
प्रमोद चौधरी । एरंडोल जळगाव जिल्हा प्रतिनिधी
येथे महात्मा फुले पुतळा परिसरात आत्माराम सोनू महाजन यांच्या घरी वीज वितरण कंपनीच्या टेक्निशियन अनिता रविंद्र पाटोळे य वीज बिलाची थकबाकी वसुली साठी गेल्या असता, वसूल न मिळाल्यामुळे पाटोळे यांनी त्या परिसरात वीज पुरवठा बंद असताना सागर अर्जुन महाजन या युवकाला सोनू महाजन यांचे घरगुती वीज कनेक्शन बंद करण्यासाठी विद्युत पोलवर चढायला सांगितले. तो पोल वर चढला असता अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे त्यास विजेचा धक्का लागल्याने तो शॉक लागून त्या ठिकाणी चिकटला. हा प्रकार लक्षात आल्यावर महिला वसुली कर्मचारी पाटोळे यांनी भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी फोन करून डीपी वरील विद्युतपुरवठा बंद करण्यास सांगितले. विद्युत पुरवठा बंद होताच सागर हा वरून खाली कोसळला. मात्र दुर्दैव असे की तो भल्यामोठ्या दगडावर आदळला. त्यामुळे डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला असून बेशुद्ध अवस्थेत सागरला एरंडोल येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सागर वर प्रथम उपचार झाल्यानंतर त्याला जळगावला खासगी रुग्णालयातील आय सी यु मध्ये
दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही एक नोंद नव्हती.
दरम्यान घटनास्थळी महिला व पुरुष यांची मोठी गर्दी झाली होती. व त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सागरला वायरमनचा काही एक अनुभव नसतांना त्याला विजेच्या खांबावर चढण्यासाठी का सांगितले ? सोन्याचे दागिने मोडून थकबाकी भरण्याचे सूनबाईने सांगितले असता वसुली अधिकार्यांनी सवलत का दिली नाही ? पूर्वसूचना न देता अचानक थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई का केली ? वीज चोरी करणाऱ्या मोठ्या ग्राहकांकडे दुर्लक्ष का केले जाते ?, सर्वसामान्य व गरीब वीज ग्राहकाला थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा दाखवला जातो, हा कोणता न्याय आहे, असे एक ना अनेक संतापजनक प्रश्न याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित केले. आता या प्रश्नांची उत्तरे वीज वितरण यंत्रणा कशी देते याची प्रतीक्षा आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की एरंडोल येथील आत्माराम सोनू महाजन यांच्याकडे घरगुती वीज बिलाची लॉक डाऊन पासून सुमारे सात हजार रुपयांची थकबाकी होती. वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञ अनिता रविंद्र पाटोळे या बुधवारी वसुलीसाठी आत्माराम महाजन यांच्या घरी गेल्या, त्यांच्याकडे थकबाकीची मागणी केली असता घरातील सुनेने माझे सोन्याचे दागिने मोडून मी तुम्हाला उद्या वीज बिलाची रक्कम देते अशी विनवणी केली, पण तरीसुद्धा सदर महिला कर्मचाऱ्याने दुर्लक्ष करून सागर महाजन याला त्या घराचे वीज कनेक्शन तोडण्यास सांगितले. विशेष हे की यावेळी परिसरात सर्वत्र लाईट गेले होते. याबाबत वसुली कर्मचारी पाटोळे यांनी खात्री करून सागर याला विद्युत पोलवर चढण्याचे सांगितले. परंतु दुर्दैव असे की वीज कनेक्शन तोडण्यासाठी सागर पोल वर चढला असता अचानक वीज पुरवठा सुरू झाला. त्यामुळे त्याला विजेचा शॉक बसला व तो त्या ठिकाणीच चिपकला हा प्रकार सर्वांच्या लक्षात आल्यावर वसुली कर्मचारी यांनी भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी विद्युतपुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद होताच सागर हा वरून खाली कोसळला तो थेट मोठ्या दगडावर आपटला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्या डोक्यात रक्तश्राव सुद्धा झाला. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आला. नंतर त्यास जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सागरला आय सी यू मध्ये उपचार सुरु आहे. सध्या तरी त्याची प्रकृती चिंताजनक आहे असे सांगण्यात आले.
सागर याची कौटुंबिक स्थिती हलाकीची असून लहानपणीच त्याचे पितृ छत्र हरपले आहे. कुटुंबात थोरला भाऊ, आई, आजी, इतकी मंडळी असून पोटाची खळगी भरण्यासाठी घरातील सर्व सदस्य धडपड करीत आहेत. सागर हा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत आहे. असे असतांना, महिला कर्मचारी पाटोळे यांनी त्याला झिरो वायरमन बनविले हे केवळ फक्त त्यांच्या सोयीसाठी.
याप्रकरणी महिला कर्मचारी पाटोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल. आत्माराम महाजन यांच्याकडे असलेल्या घरगुती वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी त्यांना पाठवण्यात आले होते अशी प्रतिक्रिया महावितरण चे एरंडोल उपविभाग अभियंता प्रशांत इंगळे यांनी दिली.

