शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२
लडाख ते कन्याकुमारी पायी प्रवास; संस्कृती बदलली तरी माणूसकी माञ बदलली नाही..!!
राहुरी : नाशिक येथील छायाचित्रकार ओंकार करपे यांनी लडाख ते कन्याकुमारी पायी प्रवास करून प्रत्येक भागातील संस्कृती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दररोज 25 ते 35 किलोमीटर पायी प्रवास करून सुमारे 4500 किलोमीटर कन्याकुमारीपर्यंत प्रवास करायचा आहे.
रविवारी सकाळी राहुरी कारखाना येथे करपे यांचे आगमन झाले असता त्यांचा माऊली प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत करून पायी प्रवासाबाबत हितगुज केले. यावेळी गेल्या 133 दिवसापासून लडाक येथून पायी प्रवास सुरु केला असून कन्याकुमारी येथे एप्रिल महिन्यात पोहोचण्याची शक्यता वतर्वली आहे. प्रत्येक भागाची संस्कृती वेगळी असली तरी आपलेपणा मात्र सर्व ठिकाणी एकसारखा वाटल्याचे ओंकार करपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाशिक येथील ओंकार करपे हे व्यवसायाने छायाचित्रकार असून छायाचित्रण करताना वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव लक्षात घेऊन करपे यांनी लडाक ते कन्याकुमारी पायी प्रवास करण्याचा संकल्प केला. त्यानुसार करपे यांनी नाशिक येथून लडाक गाठले. तेथून लेह या ठिकाणावरून 30 आँगस्ट 2021 रोजी पायी प्रवासाला सुरुवात केली. दररोज सुमारे 25 ते 35 किलोमीटर पायी प्रवास करून मार्गावर असणाऱ्या गावात मुक्काम ठोकायचा. तेथील गावकऱ्यांशी संवाद साधून गाव व गावाबरोबर त्या भागातील संस्कृती कशी आहे याचा अभ्यास करायचा त्या गावात वेगळे असे काही निदर्शनास आल्यानंतर संग्रहाचा ठेवा वाढविण्यासाठी छायाचित्रण केले जाते. या छायाचित्रणातून प्रत्येक भागातील वेगळे असे काहीतरी पहावयास मिळत असल्याने मनाला आनंद होतो. त्याचबरोबरहि तो ठेवा संग्रहित करून भावी पिढीसाठी जतन करून त्यांच्या माहितीसाठी हा ठेवा उपलब्ध होईल याचा आनंद आहे असे करपे यांनी सांगितले.
करपे पुढे म्हणाले कि. पायी प्रवास करताना लेह पासून राहुरी कारखानापर्यंत प्रत्येक भागातील संस्कृती व भाषा वेगवेगळी आहे. प्रत्येक भागातील भाषा व संस्कृती वेगवेगळी असली तरी आपलेपणा मात्र एकसारखा असल्याचे वाटत आहे. प्रत्येक गावात आदराने स्वागत केले जाते.आपुलकीने विचारपूस करून कोठून आलात आणि कोठे चाललात याची बारकाईने चौकशी करतात. या चौकशीत त्या गावातील गावकऱ्यांचा आपुलकीपणा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो यामुळे पायी प्रवासात माणसांचे चेहरेही वाचायला मिळू लागले आहेत. गावकऱ्यांशी गप्पा मारताना या गावाचे महत्व, इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने असतो. गाव बदलले तर भाषा बदलते. भाषा बदलली तर संस्कृती बदलते. परंतु माणूसकीचा आपुलकीपणा बदलताना मला कोठेही जाणवले नाही असे करपे यांनी विशेष उल्लेख करून सांगितला.
गेल्या 133 दिवसापासून लडाक येथील लेह येथून पायी प्रवास सुरु केला आहे.आजपर्यंत 2800 किलोमीटर प्रवास केला आहे. कन्याकुमारीपर्यंत पोहचण्यासाठी 4500 किलोमीटर पायी प्रवास करावयाचा आहे. कन्याकुमारीपर्यंत पोहोचण्यासाठी एप्रिल महिना उजेडणार आहे. दररोज 25 ते 35 किलोमीटर पायी प्रवास करूनही माणूसकीच्या आपुलकीपणामुळे पायाच्या वेदना कधीही जाणवल्या नाहीत.प्रत्येक गावात स्वागत केल्यानंतर आपुलकीने चहा-पाणी, जेवणाची व निवासाची व्यवस्था केली जाते असे करपे यांनी सांगितले. करपे यांचे राहुरी कारखाना येथील माउली प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत करताना किशोर कोबरणे, सचिन म्हसे, ओमकार कोबरणे, पत्रकार श्रीकांत जाधव, ऋषी राउत, गणेश डावखर आदि उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

