शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२     


‘मोक्का’ गुन्ह्यातील दोघांना वैजापूरात पकडले ; नागापूर एमआयडीसीत टाकला होता दरोडा..!!


अहमदनगर : एमआयडीसी परिसरात दरोडे, रस्ता लूट आणि चोर्‍या करणार्‍या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 26 रा. गणेश चौक, बोल्हेगाव, नगर) व अमोल सटवा कापसे (वय 23 रा. कॉटेज कॉर्नर, नगर, मूळ रा. पैठण जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल- 26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्‍हाडे याच्या टोळीने दरोडा टाकला होता. या गुन्ह्यात कुर्‍हाडे टोळीविरूध्द मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ सराईत आरोपींचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केली आहे.

पसार आरोपींपैकी सतिष शिंदे व अमोल कापसे हे दोघे वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे असल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपी शिंदे व कापसे यांचा वैजापूर येथे शोध घेवून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


कुर्‍हाडे टोळीतील आरोपी..

टोळीप्रमुख सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर) याच्यासह राहुल सुरेश जाधव (वय 21 प्रवरासंगम ता. नेवासा), पंकज बापू गायकवाड (वय 27 रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय 23 रा. कायगाव टोका ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), सागर गोरख मांजरे (रा. श्रीरामपूर), सतीश मच्छिंद्र शिंदे (गणेश चौक, बोल्हेगाव), अमोल सटवा कापसे (रा. कॉटेज कॉर्नर, नगर मूळ रा. पैठण), विक्की उर्फ विकास शिंदे (रा. श्रीरामपूर), विकास अशोक जाधव (रा. पाखोरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांच्याविरूध्द ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. या टोळीने एमआयडीसी, कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या, रस्ता लूट, दरोडे टाकले आहेत. औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यातही गुन्हे केलेले आहेत.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600