टिम इंडियांच्या नेतृत्वाची संधी मिळालेल्या पहिल्याच सामन्यात अननुभवी रिषभ पंतच्या नेतृत्वाची काहीसी अग्नी परिक्षाच झाली. कर्णधार म्हणून मैदानात उतरताच त्याला नाणेफेक गमावून अपयशाचा सामना करावा लागला.  तसे बघाल तर ज्या शहरात, मैदानात सामना होता ते दिल्ली त्याचे गृहनगर तर अरुण जेटली स्टेडियम म्हणजे त्याचे बालपणापासून हुदडण्या- बागडण्याचे ठिकाण ! परंतु या मैदानाच्या सिमारेषा दोन्ही बाजूला इतर मैदानांच्या तुलनेत छोटया असल्याने या मैदानावर दोन्ही संघांच्या फलंदाजांनी त्याचा मनमुराद लाभ घेत धावांचे डोंगर उभे केले. भारतानेही वीस षटकात ४ बाद २११ ही आपली टि-२० तील अकरावी दोनशे पार धावसंख्या नोंदवली. तसे बघाल तर जेंव्हा जेंव्हा भारताने टि- ट्वेंटी सामन्यात दोनशेच्यावर धावा केल्या त्या त्या वेळी भारताने विजय मिळविला आहे. परंतु या वेळी तसे न होता भारताची हि अद्वितीय परंपरा खंडीत झाली.

         खतरनाक फलंदाजांचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना सामन्याची परिस्थिती त्यांच्या मनासारखी जुळून आली आणि त्यांनी तिचे शब्दशः सोनं करून टाकताना सलग तेरा विजयी मिळवून विश्वविक्रम करण्याच्या भारताच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली.
        पाच सामन्यांच्या मालिकेत मनोबल वाढविणारी आघाडी मिळविल्याने नवोदितांचा भरणा असलेल्या भारतीय संघाला दबावात ठेवून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेने एक सकारात्मक बळ मिळविले आहे. तर भारताला आपल्या तुलनेने कमकुवत असलेल्या गोलंदाजीवर तातडीने काम करण्याची गरज असून ती त्वरीत केली नाही तर या मालिकेचा निकाल काय लागू शकतो हे आपण पहिल्या सामन्यात बघितले आहेच.
        भारताने हा सामना जिंकला असता तर भारताला आपल्या तुलनेत दुय्यम असलेल्या रोमानिया व अफगाणिस्तान यांच्या प्रत्येकी बारा सलग विजयांच्या विक्रमाला मागे टाकून पुढे जाता आले असते. परंतु तसे होणे नव्हते व झाले नाही.
         या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. आपल्या टि-२० कारकिर्दीतली सर्वात मोठी धावसंख्या यशस्वीरित्या पाठलाग करून जिंकण्याचा कारनामा करता आला. तर डेव्हीड मिलर व रासी वान डर ड्यूसेनने नाबाद १३१ धावांची टि२०तील दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी केली. यापूर्वीची दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ड्यू फ्लेसिस व ड्यूसेन या द. आफ्रिकन फलंदाजांच्याच नावे होती. मात्र तिच्याच चार धावांची वाढ करत मिलरने ड्यूसेनलाच आपल्या बरोबरीने कायम ठेवले. मात्र ते ग्लेन मॅक्सवेल व डेव्हिड वॉर्नरच्या १६१ धावांच्या विक्रमापासून दूर राहावे लागले.
         या सामन्याला कलाटणी देणारी नाणेफेक भारताच्या विरूद्ध गेली. ईशान किशनने ७६ धावांची सर्वोच्च खेळी केली असली तरी त्याची सुरुवात संथ होती. धडाकेबाज सुरूवातीनंतर श्रेयस अय्यर शेवटी शांत झाला. शेवटच्या षटकात आयपीएल मध्ये सर्वात विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिकला स्ट्राईक न देणे हार्दिक पांड्याची महाचूक ठरली. या सर्व बाबी व्यवस्थीत झाल्या असत्या तर भारताच्या खात्यात कमीत कमी ३० धावा वाढल्या असत्या व त्या कदाचित आफ्रिकेच्या आवाक्याबाहेरच्या ठरल्या असत्या.
          शिवाय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या यजुवेंद्र चहलला पूर्ण कोटा गोलंदाजी न देणे हि कर्णधार रिषभ पंतची सर्वात भयंकर चुक ठरली. डेव्हिड मिलर त्याला फोडून काढेल अशी पंतची समजूत होती. परंतु चहलच मिलरला बाद करू शकतो हे तो साफ विसरल्याने भारताला नाचक्की पत्करावी लागली. तसेच हार्दिक पांड्यालाही गोलंदाजी देण्याचे समिकरण पंतला जुळवता न आल्याने भारत विजयापासून दूर राहीला. श्रेयसने ड्यूसेनचा झेलच सोडला नाही तर मॅचच सोडली असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण त्यानंतरच ड्यूसेनने उग्र रूप धारण केले व आफ्रिकेला विजयी करण्यात महत्वाची भूमिका साकारली.
           मालिकेतील पहिल्याच सामन्यात हरण्याची हि काही पहिलीच वेळ नसल्याने भारताने खचून न जाता जोमाने लढत देऊन पुढच्या सर्व लढती जिंकून मालिका खिशात टाकण्याचा इतिहास लिहीलेला आहे. त्यासाठी सर्वच स्तरावर आपली कामगिरी करण्याची जबाबदारी टिम इंडियावर आली असून एक भारतीय म्हणून आपण त्यांच्या कडून अशी अपेक्षा करायला काही एक हरकत नाही. त्याचबरोबर टिम इंडियाला शुभेच्छा देण्यातही कुचराई करायची नाही.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com