अगदी अलीकडच्या काळात डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे यांचा "अंत:स्थ हुंकार" हा कवितासंग्रह वाचला. खूप दिवसात एक दर्जात्मक कविता अनुभवायला मिळाली. कृषी संस्कृतीचे वास्तव टिकणारी ही कविता शेतकऱ्यांचा आवाज बनते.त्यांच्या जीवनातील संघर्ष मांडते .त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या संघर्षाचे, त्यांच्या लढण्याचे चित्र साकार करते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव या पदावर प्रशासकीय काम करणारे डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या सामाजिक जाणीवा अतिशय प्रगल्भ आहेत. समाजातले सत्ता कारण, राजकारण, अर्थकारण, कृषी अर्थव्यवस्था, मूल्यव्यवस्था या संदर्भातील त्यांची स्पष्ट निरीक्षणे आणि ठाम भूमिका या कवितासंग्रहातून व्यक्त होते.

        वर्तमानपत्रातील अस्वस्थ करणाऱ्या बातम्या, घडामोडी, शिक्षण, समाजकारण, राजकारण, नातेसंबंध कौटुंबिक संबंध, कृषी संस्कृती असे निरनिराळे आयाम घेऊन ही कविता आपल्यासमोर येते. हा कवितासंग्रह हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून एकूण ७४ कविता वाचावयास मिळतात. "जे न देखे रवी ते देखे कवी" या उक्तीप्रमाणे चालू घडामोडी वाचून कवीचे मन विषन्न होते. पावसाने घातलेला धुमाकूळ त्यांना अस्वस्थ करतो .विस्कळीत झालेल्या जनजीवन कवीला अस्वस्थ करते. मानवी जीवनाचे झालेले अतोनात नुकसान ते पाहू शकत नाहीत आणि त्या वेदनेतून त्यांची कविता फुलते.

विठू निसर्गाचा | थांबव तांडव
करु दे मांडव | पुन्हा उभा ||

असा जबरदस्त आशावाद व्यक्त करणारी महापूर कविता आहे.

हिच ती प्रार्थना | नसे दुःख कोणा
 कृपा दयाघना | ठेवशिरी ||

                  अशी विश्वात्मक प्रार्थना ते कवितेतून करतात.अनाथांची माय कवितेतून ते सिंधूताई सपकाळ यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर उभा करतात. अवकाळी पाऊस मांडून ते शासकीय धोरणांचा खरपूस समाचार घेतात.
"नाठाळाच्या माथी हाणू काठी"
अशी संत तुकारामांसारखी भुमिका स्वीकारतात.ते म्हणतात की,

लाच खाऊ येती | पंचनाम्यासाठी मारावया काठी |कुणब्याला ||
वाढताच भाव |करती आयात 
कुणब्याचा घात |करावया ||

 मातीवर, शेतीवर त्यांचे मनापासून प्रेम आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे असे त्यांना मनापासून वाटते. एक उत्तम प्रशासक असलेले कवीवर्य शिवाजी शिंदे शेतकऱ्यांसाठी पावसाला साकडे घालतात. कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला वेठस धरले हे वास्तव कवी 'कोरोना महामारी' या कवितेतून व्यक्त करतात. कोरोनाच्या काळात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. अनेकांचे आई-बाबा हिरावले. या सर्व वेदना त्यांच्या कवितेत उमटू लागतात. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी वारीची ओढ लागते पण कोरोनामुळे वारीला जाता येत नाही. ही हुरहुर अनेक वारकऱ्यांच्या मनात आहे. ही अस्वस्थता आषाढी वारीच्या निमित्ताने वारीच्या अभंगरुपी रचनेमध्ये कवी व्यक्त करतात.

संपू दे कोरोना | हिच मनोकामना
येऊ दे दर्शना | कृपाघना ||

'गुरु' या कवितेत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करतात. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. ध्येय स्पष्ट असले पाहिजे. लक्ष अचूक असले पाहिजे. कर्तव्य तत्पर असले पाहिजे असे त्यांना वाटते. देवाचा भक्ती भाव मनात असलेले हे कवी देशावर अतोनात प्रेम करतात.भावकीतील वास्तव मांडताना 'वाटणी' कविता लिहून ते दुभंगलेली मने व्यक्त करतात.परिस्थितीला कंटाळून वडीलांनी आत्महत्या करु नये अशी भावना व्यक्त करणारी 'व्यथा कन्येची' ही कविता साकार करतात.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर खाजगीकरण, उदारीकरण, खुली अर्थव्यवस्था असे धोरण आपण स्वीकारलेले आहे आणि त्यामुळे झालेले खाजगीकरण, ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, आर्थिक विवंचना,आत्महत्येचे सत्र, कर्जबाजारी आयुष्य या सर्व व्यथा शिवाजी शिंदे या कवीच्या कवितेतून व्यक्त होतात. समाज वास्तवाच्या चटक्यांनी गहिवरून आलेले कवी मन या कवितासंग्रहातून व्यक्त होते. हा कवितासंग्रह शेती माती कृषी संस्कृतीच्या आणि माणुसकीच्या अथांग भावनेतून व्यक्त झालेला आहे. बळीराजा आणि त्याचे जगणे कवी आपल्या शब्दात मांडतो.

      'हल्ली गावाकडे जाणं जमत नाही'या कवितेतून  मध्यमवर्गीय, पांढरपेशी शेतकऱ्यांच्या मुलाचे मनोगत व्यक्त करतात.अन्याय अत्याचा-ला बळी पडणा-या स्रियांविषयीची कणवाळू भुमिका व्यक्त करुन त्यांची कविता दुष्टांच्या संहाराची भाषा बोलते.सामाजिक समतोल टिकवण्यासाठी त्यांचे समाजभान कायम जागृत असल्याचे जाणवते.राजकारणातली दादागिरी, घराणेशाही, गुंडगिरी, मक्तेदारी संपली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका ते कवितेतून मांडतात.भांडवलशाही,दलाली, खाजगीकरला विरोध करणारी त्यांची कविता राज्यघटनेतील न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचा उद्घोष करते.नेत्यांचे दौरे, खोटी आश्वासने हा कवी कवितेतून मांडतो. शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले हे भोगाचे जगणे कवी अर्थपूर्ण शब्दात मांडतो. त्यांचे दुःख ,दैन्य दारिद्र्य, आपल्या मनाला भिडते. अर्थकारण आणि सत्ताकारण याबाबतीतले बेइमानी कवी प्रभावीपणे मांडत राहतो. अतिशय संवेदनशील मनाने कवीने अवतीभोवतीचा भोवताल व्यक्त केलेला आहे. शासकीय धोरण, कृषी अर्थव्यवस्थेचे वास्तव ,शेतीचे अर्थशास्त्र कवीने मांडले आहे. स्त्रियांच्या वाट्याला आलेले दुःख, त्यांच्या वेदना, त्यांची स्पंदने मांडण्याचे काम कवीने कवितेतून केले आहे. जगण्याचा भोगवटा भोगणा-या महिला भगिनींचे दुःख कवी आपल्या शब्दात मांडतो.
'आयुष्यात काय कमवावं' या कवितेत जगण्याची सार्थकता व्यक्त करतात.वेळ माणसाला योग्य धडे देत शिकवत असते हे वास्तव सांगायला ते विसरत नाहीत. लेकी मध्ये असलेले स्वाभिमानाचे बीज 'वडीलांचा मुलीला संदेश' या कवितेतून दिसून येते. वाईट अविवेकी विचार न करता परिस्थिती बिर्याणी जगाला शिकले पाहिजे असा संदेश त्यांची कविता देते.
 डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताप्रमाणे माणसाने हजारो वर्षांपासून विकास केला आहे. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे आणि तरीही माणसांमध्ये सैतान शिल्लक आहे असे वास्तव कवी सांगतो. स्वार्थी, विश्वासघात करणारी निर्दय माणसे अवतीभवती असतात  म्हणून जीवाला जीव जोडणारी माणसे जपावीत. प्रेम करणारी माणसे जोडावीत ही माणूसपणाची भूमिका कवीने घेतलेली आहे. त्यांच्या ब-याच रचना या अभंग रूपातून व्यक्त होतात. त्यांचा भक्तीभाव माणुसकेंद्री आहे. जनकल्याणासाठी ते भगवंताकडे प्रार्थना करतात. त्यांनी सर्वार्थाने सामाजिक आणि जातीय विषमता नाकारलेली आहे. त्यांच्या कविता संविधानाच्या मार्गाने जातात. समतेच्या मार्गाने जातात. समाजामध्ये एकत्व असावे असे त्यांना मनापासून वाटते .संत ज्ञानेश्वरांसारखे पसायदान मागून जगाच्या कल्याणासाठी ते आपल्या कवितेतून विश्वासाठी माणुसकीचे पसायदान मागतात.संपूर्ण जगात शांतता नांदावी असे भगवान बुद्धाच्या मार्गाने जाणारे कवी शिवाजीराव शिंदे आहेत. राजकीय दांभिकता, भ्रष्टता त्यांना नको वाटते. 

             श्रीमंत व गरीब यांच्यातली दरी संपवावीशी वाटते .अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने त्यांची कविता शब्दातून व्यक्त होते. उत्तम आकलन, उत्तम निरीक्षण, वस्तुनिष्ठ मांडणी त्यामुळे त्यांची कविता दर्जात्मक पातळीवर पोहोचते. या जीवन संघर्षात कोणीही स्वतःला संपू नये असे त्यांना वाटते. मौल्यवान आयुष्य गमावू नये असे त्यांना वाटते. धुण भांडी करून मुलाला शिकवणारी माय आणि साललगडी बापाचे ऋण कधीच विसरू नये असे सांगणारी 'जन्मदात्याचे ऋण' ही कविता ते लिहितात. माणसाने माणसाला आधार द्यावा, माणसाने नेहमी माणुसकीचेच गाणे गावे असे त्यांना वाटते. गावकी आणि भावकी मांडणारी त्यांची कविता "शेवटी गड्या आपला गाव बरा" असा संदेश देते. शिक्षण संस्थामधले बाजारु वातावरण, तासिका तत्त्वावर काम करणा-या शिक्षकांची ससेहोलपट ते 'शिक्षणाचा बाजार' या कवितेत ते अधोरेखित करतात आणि शिक्षक या कवितेत शिक्षकांचे महत्त्व पटवून देतात.
 शिक्षक आन-बान- शान असतात ! शिष्यांचा स्वाभिमान असतात! आजी-आजोबाला वृद्धाश्रमात पाठवू नका असे वास्तव त्यांची कविता सांगते. जगण्याचे एक समंजस शहाणपण त्यांच्या कवितेत दिसते. दुःखाच्या भोवतालामध्ये माणुसकीचा शोध घेणारे हे कवी आहेत. "प्रसंगी पाडले जाऊन एकाकी प्रगतीच्या वाटा अडविणारेही भेटतील तुला तू मात्र आत्मविश्वास दळू देऊ नकोस धैर्याने तोंडे येणाऱ्या संकटाला तू चिडावं, विचलित व्हावं म्हणून तुला दिसण्याचा प्रयत्न होईल  अशा समयी तू स्वतःला आवरावं आणि सावरावं देखील सत्याला अनंत अडचणी असतात पण सत्य कधीच पराभूत होत नसतं सगळं संपलयं असं वाटत असताना स्वकर्तृत्वावर तूच गगनभरारी घेऊ शकशील" ही कवीची ठाम भूमिका आहे.जगण्यातले हे वास्तवाचे चटके त्यांनी पचविले आहेत.प्रत्येकामधे एक फिनिक्स असतो हा संदेश त्यांची कविता देते.

"कविता अंतरीचा ठाव 
मनातला भाव उजाडलेला गाव
 जिव्हारीचा घाव"
अशी कवितेची भुमिका मांडत ते कवितेतून मूल्य संवर्धित करतात.भाई एन.डी.पाटील यांच्या गुणवैशिष्ट्ये सांगून त्यांचा आदर्श उभा करतात.
झाडाखाली झोपलेल्या बाळाला साप चावतो त्याचा मृत्यू होतो, आईचे दुःख व्यक्त करणारी  ही कविता व्यक्त होते. शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या करू नये असे त्यांना वाटते. शिक्षकांचा आदर्श, मतदान जागृती, लोकशाहीचे संवर्धन, बळीराजाच्या कविता असे अनेक आयाम असलेली त्यांची कविता आहे. त्यांचे समाजभान नेहमी जागृत असते. शेती मातीचे महत्त्व व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. वास्तव जीवनातला,हदयातला "अंतस्थ हुंकार" त्यांनी खऱ्या अर्थाने या कवितांमधून टिपला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनात राहूनही अतिशय तरल संवेदनशीलतेने त्यांनी या कविता लिहिल्या आहेत.
     डॉ.शिवाजी शिंदे यांनी अनेक कवितांना अभंगाचा फॉर्म वापरलेला आहे. त्यांच्या काही कविता मुक्तछंदात्मक आहेत. काही कविता ग्रामीण बोली भाषेत व्यक्त झालेल्या आहेत. त्यांच्या काही कविता अष्टाक्षरी बाजाच्या आहेत .हृदयाच्या तळघरातून आलेल्या या कविता आपल्या प्रत्येकाच्या काळजाला भिडतात. आपल्या मनात विलक्षण अशी जागा निर्माण करतात. त्यांच्या प्रत्येक कवितेतून काही मूल्य प्रवर्तित होते. त्यांच्या कविता आपल्या जगण्याला दिशा देतात. आपल्याला स्वाभिमान देतात. समाज वास्तवाची जाणीव देतात म्हणून काळाच्या पटलावर उमटणारे "अंत:स्थ हुंकार "हे अक्षर वाड्.मय कालातीत आहे हे नक्की!

 डॉ. गुंफा कोकाटे
प्राचार्य,
कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर,ता.श्रीरामपूर,जि.अहमदनगर
तरंगध्वनी - ९८९०८४४४८२
-----------------------------------------------
संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर
-----------------------------------------------