अहमदनगर ।  दि.२६ :- आरोपी नामे आकाश बबन शिरसाठ , वय - २० वर्षे , रा . प्रसादनगर , राहुरी फॅक्टरी , ता . राहुरी जि . अहमदनगर , याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अहमदनगर येथील में.जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ श्रीमती एम.ए. बरालिया यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४ तसेच भा.द.वि. कलम ३७६ ( २ ) ( एन ) नुसार दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच रक्कम रूपये २०,००० / - हजार रूपये व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले. 

घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक ०१.०७.२०१५ रोजी पिडीत मुलीची आई फिर्यादी हिने राहुरी पोलिस स्टेशनला गु.र.नं. २५२/२०१५ भा.द.वि. कलम ३६३,३६६ नुसार तिची मुलगी पिडीत हिस आरोपी आकाश बबन शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावून पळून नेलेबाबतची फिर्याद दाखल केलेली होती. सदर घटनेचा तपास पी . एस . आय . सी . आर . गावंडे यांचेकडे दिल्यानंतर सदर पिडीत मुलगी ही दिनांक ३१.०७.२०१५ रोजी इंदापुर येथे आरोपी सोबत मिळून आली. पिडीत मुलगी मिळाल्यानंतर तिचा जबाब राहुरी पोलिसांनी नोंदविला. त्यावेळी तिने सांगितले की, आरोपी आकाश बबन शिरसाठ याचे लग्न झालेले असून तो तिला म्हणायचा की, मला माझी बायको आवडत नाही मला तुझे सोबत लग्न करावयाचे आहे. आपण पळुन जावू . त्यावेळी पिडीत मुलगी आरोपीला म्हणाली की , माझे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे.असे वारंवार सांगितले. असे असताना देखील दिनांक २६.०६.२०१५ रोजी आरोपी हा पिडीत मुलीला घेवून श्रीरामपुर रेल्वेस्टेशनला गेला. श्रीरामपुर येथून आरोपीने पिडीत मुलीस रेल्वेने दौंण्ड मार्गे तिरुपती बालाजी येथे देव दर्शनासाठी घेवून गेला. दर्शन घेतल्यानंतर आरोपीने पिडीत मुलीस इंदापुर येथे एक खोली भाडयाने घेवून ठेवले. तेथे राहत असताना आरोपी हा पिडीत मुलीशी बळजबरीने शारिरीक संबंध करत होता. 


सदर पिडीत मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर राहुरी पोलिसांनी गुन्हयामध्ये आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३७६ व पोक्सो कायदा कलम ४ इत्यादी वाढीव कलम लावले. सदर गुन्हयाचा तपास पी . एस . आय . सी . आर . गावंडे यांनी पूर्ण करून मा. न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. 

सदरचा खटला सुरूवातीला मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांचे न्यायालयात चालला. तेथे सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी , अल्पवयीन पिडीत मुलीची साक्ष , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात नगर परिषद राहुरी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर सदर खटल्याचे शेवटचे कामकाज तसेच युक्तीवाद मा . जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र . २ श्रीमती एम.ए. बलिया मॅडम यांचे न्यायालयात पूर्ण झाले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे आकाश बबन शिरसाठ यास मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी पोहेकॉ . डहारे , के . एन . पारखे , पो.हे. कॉ . संजय आर . पठारे , पो.कॉ. रमेश शिंदे यांनी सहकार्य केले ..