मयतात दोन सख्ख्या भावांचा समावेश!!
अपघातग्रस्तांना केली भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्राध्यापक डॉक्टर विजय ठोंबरे आणि भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार व बालाजी तांदळे यांनी मदत.
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज बीड रोडवर एक मोटार सायकल आणि बन्सल शाळेच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मोटार सायकल वरील पारधी समाजातील तिघे गंभीर जखमी झाले होते त्यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.
केज-बीड रोडवरील कोरेगाव जवळ शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान बन्सल क्लासेसच्या विद्यार्थी उतरण्यासाठी रस्त्यात उभ्या असलेल्या गाडी क्र. (एम एच-४४ /९९९६) ला मोटार सायकलीने क्र. ( एम एच -१३/बी जे ८५७४) ने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील सुनील मधुकर शिंदे वय (२५ वर्ष) रा. पिंपळगाव ता. केज हा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू पावला तर दिपक कल्याण पवार वय (२० वर्ष) हा अंबेजोगाई येथे गेल्या नंतर मयत झाला. तसेच भागवत कल्याण पवार वय (२२ वर्ष) रा. कोरेगाव ता. केज यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असल्याने त्याला लातूर येथे हलविले असता त्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले कोरेगाव येथील दीपक कल्याण पवार आणि भागवत कल्याण पवार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. पिंपळगाव येथील सुनील मधुकर शिंदे या त्यांच्या नातेवाईकांचा एकाचा समावेश आहे.
दरम्यान या रस्त्याने प्रवास करीत असलेले भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, राष्ट्रवादीचे नेते बालाजी तांदळे आणि रिपाइंचे गौतम बचुटे यांनी रस्त्यात थांबून पोलीस दवाखाना व रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. जखमींना रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांच्या मदतीने आणि एका खाजगी कार चालकाने जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात हलविले. जखमींची त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविले होते.



