शौकतभाई शेख
श्रीरामपूर - अहमदनगर जिल्हा गुरुकुल शिक्षक मंडळ व गुरुकुल महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा नारीशक्ती पुरस्कार इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आजीव सभासद व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा बेलापूर येथील शिक्षिका तरन्नुम अब्बास खान यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून इंद्रजीत देशमुख, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, डॉक्टर राजेंद्र धामणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
तरन्नुम खान यांनी लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचे स्मार्ट ऑनलाईन स्कूल नावाचे यूट्यूब चैनल सुरू करून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाचे एकूण ३०४ व्हिडिओ तयार करून अपलोड केले. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील ८३ लाख विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला तर ५१ हजार विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले.
त्याचबरोबर दीक्षा पोर्टलवर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. या पद्धतीने लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. दीक्षा पोर्टलवर त्यांनी बरेच व्हिडिओ अपलोड केले आहे याचा विद्यार्थी लाभ घेत आहेत.
तरन्नुम खान यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र कलाध्यापक संघ पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षका पुरस्कार, तसेच दक्ष व्यसनमुक्ती संघ अहमदनगर यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, कोविड-१९ विरुद्ध सुरक्षा राष्ट्रीय पुरस्कार, कलाध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय कलारत्न पुरस्कार, सुप्फा असोसिएशन श्रीरामपूर यांच्यावतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, मिशन स्कॉलरशिप श्रीरामपूर यांच्यावतीने तालुकास्तरीय पुरस्कार, तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटात लोकसंख्या शिक्षण व शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रमास तालुकास्तरावर सलग चार वर्ष प्रथम क्रमांकाचे बक्षीस तर जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहेत.
तरन्नूम खान यांच्या पुरस्काराचे रेड क्रॉस चेअरमन तथा प्रांत अधिकारी अनिल पवार, व्हाईस चेअरमन तथा तहसीलदार प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आदींसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

