एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार...
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील तीन शालेय विद्यार्थी ,चुलत भाऊ शेतातील खेळत खेळत पाण्याच्या खड्ड्यात गेले त्यात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने गावावर शोककळा पसरली. सायंकाळी सात वाज गावाजवळील स्मशानभूमीत एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी केज पासून १५ कि मी अंतरावर असलेल्या पैठण (सावळेश्वर) येथे चि. स्वराज जयराम चौधरी वय (७ वर्ष), चि. पार्थ श्रीराम चौधरी(८ वर्ष), कानिफनाथ गणेश चौधरी वय वर्ष ७ ही तीन चुलत भाऊ गणेश चौधरी यांच्या शेतातील बोअर शेजारी असंलेल्या पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात आंघोळीसाठी गेली असता त्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी हजर झाले त्यानी प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यात आले. पैठण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
-----------------------
पौळ बी के
मुख्याध्यापक जि प शाळा पैठण
तिनही विद्यार्थी अतिशय हुशार होते.नेहमी विविध कलाप्रकारामध्ये सहभागी होत असायचे.या चुनुकदार चिमुकल्यांचे निधन ही घटना अत्यंत वाईट आहे. या घटनेने आम्ही सर्वजण शाळेचे शिक्षक वृंद अस्वस्थ झालो आहोत
----------------------
वॉटर कप स्पर्धेत श्रमदानासाठी सहभाग
मागील वर्षाच्या वॉटर कप स्पर्धेत तीनही विद्यार्थ्यांचा श्रमदानासाठी सक्रिय होता या आठवणीने गावातील सर्वांचे डोळे पाणावले
----------------
घटनास्थळी भेट आणि सांत्वन
तहसीलदार दुलाजी मेंडके सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, आमदार प्रतिनिधी नंदकिशोर मुंदडा
यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.
--------------------
स्मशानभूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार झाले .सर्वत्र प्रचंड आक्रोश झाला यामुळे मन हेलावले.
----------------
मित्र गेल्याने शाळकरी चिमुकल्यांचा बांध फुटला
शाळेतील या तीनही विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी निधनाने शाळेतील इतर विद्यार्थी अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांचाही बांध फुटला आणि अनेक चिमुकले धाय मोकलून रडत होते.
---------------------
अन गावात चुलीही पेटल्या नाहीत
दुःखद घटनेने अंत्यसंस्कारानंतर पैठण येथील बहुतांशी चौधरी कुटुंबांमध्ये सायंकाळच्या चुली पेटल्या नाहीत गावात सर्वत्र शोकाकुल वातावरण होते
---------------------
पाडव्याच्या पूर्वसंध्येला वाईट आणि दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे घटनेने सर्वांचे काळीज पिळवटले
----------
मातांनी फोडला हंबरडा
तीनही मुलांच्या मृत्यूनंतर लेकरू गेल्याने शेवटची भेट घेताना तिन्ही मातांनी आक्रोश करत हंबरडा फोडला यावेळी सर्वांना बांध फुटल्याने अश्रू आवरता आले नाहीत.

