धाराशिव–
भारत स्वतंत्र झाल्यापासून विकासापासून कोसोदूर राहिलेल्या वडार समाजासाठी पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ मंजूर करुन अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व महामंडळासाठी ऐतिहासिक पाठपुरावा करणारे समाजबंधू आ. अभिमन्यू पवार यांचा अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे यांनी भव्य पुष्पहार घालून सत्कार केला.
वडार समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासापासून कोसोदूर असल्याने समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. अशी अनेक वर्षापासून मागणी होत होती. याकरिता अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही याकरिता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मागणीची दखल घेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात वडार समाजाकरिता पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ मंजूर करुन 50 कोटी निधी देण्याची घोषणा केल्यामुळे समाजामधून आनंद व्यक्त होत आहे. महामंडळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई त्याच्या 'सागर' या निवासस्थानी भेट घेऊन अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे यांनी भव्य पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच समाजाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

