वडाळा महादेव प्रतिनिधी:
विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले आणि स्त्रीजीवनाला माणूस म्हणून अनेक अधिकार दिले,ते व्यापक विचारांचे होते, सामान्य आणि बहुजन समाजाला त्यांनी जगण्याचा प्रकाशमार्ग दाखविला ते खऱ्या अर्थाने मानवतेचे आदर्श होते, असे विचार सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभाताई उत्तमराव दाभाडे यांनी व्यक्त केले. 

येथील माऊली वृद्धाश्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.शोभाताई दाभाडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, सत्कार  केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र सांगून 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'कविता सादर केली. यावेळी कु.श्रुती दाभाडे,प्रा. शिवाजीराव बारगळ, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,राष्ट्रपती पदक विजेते माजी प्राचार्य बबनराव तागड,ॲड.बापूसाहेब इंगळे, ॲड.,लबडे, पत्रकार, कवी राजेंद्र देसाई,दाभाडे परिवार, बोर्डे परिवार, शुभम नामेकर आदींसह वृद्धाश्रमातील आजीआजोबा उपस्थित होते.
सौ.शोभाताई दाभाडे यांनी महिलांचे उद्धारकर्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वेगळेपण सांगितले.पुरुषप्रधान संस्कृतीत स्रिया गुलामच होत्या. उपेक्षित घटकांना त्यांनी न्याय दिला. मातोश्री रमाबाई यांना त्यांनी सांगितले होते की, महिलांची उन्नती आणि त्यांची सामाजिक गुलामीतून मुक्ती यांना प्राधान्य देईल, ते त्यांनी केले. साक्षरता आणि आत्मभान त्यांनी दिले, असे विविध विचार सांगून कामगार कामाचे तास १२ वरून ०८ केले, कुटुंब नियोजन विधेयक मांडले, स्त्रीसमानता असे विचार व्यक्त केले. प्राचार्य बबनराव तागड,सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ,डॉ. भाऊसाहेब कवाडे, कु. श्रुती दाभाडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आणि त्यामुळे भारतीय माणसांना मिळालेली लोकशाही याविषयी विवेचन केले, त्यांनी केलेली रिझर्व बँकेची स्थापना आणि अर्थतज्ज्ञ डॉ.आंबेडकरांचे महत्व सांगून माऊली वृद्धाश्रमात असे लोकप्रबोधनकारी उपक्रम होतात, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञान यांची समरसता महत्वाची आहे, 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा 'यातील अर्थ लक्षात घ्यावा असे आवाहन केले. शेवटी पत्रकार राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.
*वृत्तसंकलन : समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर