प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. १९ /  करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने दणदणीत विजयी मिळवला आहे. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बागल गटाचे आठ उमेदवार बिनविरोध झाले होते. तर नऊ जगासाठी १४ उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. त्यात बागल गटाचे सर्व उमेदवार विक्रमी मताने विजयी झाले असून विरोधी गटाचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे बागल गटाला कारखान्यावर एकहाती सत्ता राखण्यात यश आले आहे. 

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत बागल गटाच्या विरुद्ध दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी पॅनल उभा केला होता. मात्र त्यांचे प्रमुख अर्ज अपात्र ठरल्याने या निवडणुकीतील चुरस संपली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी पाच अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक लागली होती. त्याची मतमोजणी रविवारी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी काम पाहिले. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे यांच्यासह सर्व पोलिस यावेळी उपस्थित होते.

मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे पहिल्या फेरीतच निकालाचा अंदाज आला होता. पहिल्या फेरीचा कौल येताच बागल गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालात आंनदोत्सव केला.