शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 शैक्षणिक बातमी 

विद्या प्रसारिणी सभेचा माजी विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेला             ' विशाल सुनील हरिहर ' या विद्यार्थ्याने राज्य सरकार कडून घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून देश सेवेचा मार्ग अवलंबला आहे. 

एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सदर परीक्षेमधून अनेक विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात, परंतु सर्वांनाच यश प्राप्त होते असे नाही. विशालचे हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरणारे आहे.
     राज्य सरकारकडून सरळसेवा भरती द्वारे अनेक पदे भरली जातात, याद्वारे वन विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि ' विशालने ' विशाल यश प्राप्त केले.
     विशाल हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावचा विद्यार्थी आहे. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातील  जिल्हा परिषदेच्या शाळेत, पाचवी ते दहावी श्रीमती शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली, अकरावी व बारावी व्ही.पी.एस.लोणावळा आणि नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
     विशालची घरची परिस्थिती अगदी बेताची असून घरामध्ये तीन भावंडे आहेत. आईने भाजीपाला विकून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. विशाल जिद्दी मुलगा असल्याने आणि आई करत असलेले कष्ट तो पाहत होता. बाल वयापासूनच विशालने मनामध्ये निश्चय केला आणि राज्य सेवेचे स्वप्न उराशी बाळगले. अनेक वर्ष  हुलकावणी देत असलेल्या यशाला शेवटी  विशालने गवसणी घातली आणि आपले राज्य सेवेचे स्वप्न पूर्ण केले. विशालने प्राप्त केलेल्या यशामुळे गाव, तालुका नव्हेतर जिल्ह्यामधून त्याचे कौतुक होत आहे.
     विशालने प्राप्त केलेले यश इतर विद्यार्थांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्याच्या कार्यामधून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येईल यात शंका नाही.