भारतात होत असलेली तेरावी विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्याकडे कूच करत असताना आता मोजकेच साखळी सामने शिल्लक आहेत. त्यातून तीन उपांत्य फेरीचे उमेदवार निवडायचे आहेत आणि यासाठी दक्षिण आफ्रीका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड यांच्यात जोरदार रस्सीखेच होणार आहे. कारण या संघांचे प्रत्येकी दोन सामने बाकी असले तरी कोणता संघ विजय मिळवून सरस धावगती राखून उपांत्य फेरीचे आपले स्वप्न साकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. यजमान भारताने या स्पर्धेत सर्वच्या सर्व सात सामने जिंकून आधीच आपले उपांत्य फेरीचे सिट पक्के केले आहे तर दक्षिण आफ्रिकेचे बारा गुण असल्याने त्यांचेही स्थान पक्के दिसते. मात्र उर्वरीत दोन जागांवर कोण आपला दावा निश्चित कोणता संघ करतो हे बघणे मनोरंजक ठरेल. हा लेख लिहीला जाईपर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड व अफगाणिस्तानचे प्रत्येकी आठ गुण असून यातील दोन संघ निश्चितपणे आपणास उपांत्य फेरीत खेळताना दिसतील असे वाटते. तर पाकिस्तानचे सहा गुण असले तरी वरील तीन संघांच्या उर्वरीत दोन सामने व धावगतीच्या आधारावर उपांत्य फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न अवलंबून आहे.

                शुक्रवारी लखनौच्या इकाना स्टेडियमवर अफगाणिस्तान व नेदरलँड यांच्यात एक महत्वाची लढत झाली. हे दोन्ही संघ नवखे असले तरी त्यांच्या झकास कामगिरीमुळे स्पर्धेतील रंगत अद्यापही टिकून आहे. लखनौची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याच्या आशेने अफगाणिस्तानने चार फिरकी गोलंदाज खेळविले मात्र त्यांच्या फिरकी गोलंदाजांपेक्षा क्षेत्ररक्षकांनीच चमकदार कामगिरी करून नेदरलँडचे आव्हान थंड केले व उर्वरीत काम त्यांच्या फलंदाजांनी यशस्वीरित्या पूर्ण करून सामना खिशात टाकला व गुणतालिकेत मोठा उलटफेर करून चक्क उपांत्य फेरीसाठी आपला दावा ठोकला आहे. अफगाणिस्तानचे आणखी दोन सामने बाकी असून बलाढ्य दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया बरोबर त्यांना दोन हात करायचे आहेत. वरकरणी या दोन संघांना हरविणे अफगाणिस्तानसाठी कठिण दिसत असले तरी त्यांनी याच स्पर्धेत इंग्लंड, पाकिस्तान व श्रीलंका या माजी विश्वविजेत्यांना चकीत केले असल्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखून हलक्यात घेणं संबधीत संघांना महागात पडेल. 
                  फिरकी गोलंदाजी खेळणं ही दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाची कमजोर बाजू आहे व हिच कला अफगाणिस्तानची जमेची बाजू आहे. जर फिरकीला धार्जिनी खेळपट्टी अफगाणिस्तानला मिळाली तर दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला हरविण्यातही अफगाणिस्तान यशस्वी ठरू शकतो. त्यातल्या त्यात त्यांची कमकुवत बाजू गणली जाणारी  फलंदाजीही भक्कम झाली आहे. त्यांनी जिंकलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजी केलेल्या प्रत्येक फलंदाजाने आपली कुवत व क्षमता यांचा योग्य समन्वय साधत संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या दोन्ही सामन्यात अशीच कामगिरी करण्याची प्रेरणा त्यांच्या सर्वच फलंदाजात नक्कीच रुजली असणार. अफगाणिस्तानसाठी जमेची बाब म्हणजे त्यांच्यासाठी मेंटॉर म्हणून भूमिका बजावत असलेला अजय जडेजा सारखा माजी भारतीय कर्णधार त्यांना महत्वाचे सल्ले देऊन खेळाडूंवरचा मानसिक तणाव कमी करत आहे. नेमकी हिच बाब अफगाणी खेळाडूंना त्यांच्या पेक्षा वरचे मानांकन असलेल्या संघाना चकीत करण्यासाठी बळ देत आहे.
              बुधवारी झालेल्या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आश्वासक सुरुवात केली खरी परंतु अफगाणिस्तान समोर आव्हान ठरेल इतकी धावसंख्या ते फलकावर लावू शकले नाहीत. मोहम्मद नबी तीन, नूर अहमद दोन यांच्यानंतर त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी चार फलंदाज धावबाद व एक यष्टीचित करून नेदरलँडचे कंबरडेच मोडले. जेमतेम एकशे ऐंशी धावांचे लक्ष समोर असताना अफगाणिस्तानचीही सुरुवात खराबच झाली. गुरबाज शुन्यावर परतला. मात्र त्यानंतर कप्तान हशमतुल्लाहने नाबाद ५६, रहमत शाहने ५२, व अजमतुल्लाहने नाबाद ३१ धावा करून विजयी लक्ष गाठले. येथून पुढील सामन्यात त्यांची कामगिरी व नशिबच उपांत्य फेरीचे दार उघडेल का नाही हे ठरवेल.
               रविवारी, अंतिम फेरीपूर्वीचा सर्वात मोठा सामना गुणतालिकेत आघाडीवरील दोन संघ यजमान भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारत स्पर्धेत अपराजित आहे तर दक्षिण आफ्रिकेवर पात्रता फेरीतून आलेल्या नेदरलँडकडून झालेल्या एका अनपेक्षित पराभवाचा दाग आहे. मात्र त्या धक्कादायक पराभवातून आफ्रिका सावरलेली दिसते. कारण त्यानंतर सलग पाच विजय मिळवून द. आफ्रिकेने स्वतःची बाजू मजबूत केली आहे. द आफ्रिकेने फलंदाजी करताना तिन टप्पे ठरवून मोर्चेबांधणी रचली आहे. पहिले तीस षटके वनडे, तीस ते चाळीस दरम्यान टि२० व शेवटचे दहा षटके टि- टेनच्या सुत्रानुसार फलंदाजी करून धावांचे डोंगर रचून प्रतिस्पर्ध्यांना त्याच धावांच्या दडपणात दाबून टाकताना मोठमोठे विजय साकारले आहेत. त्यामुळेच त्यांची धावगती सर्वच संघापेक्षा कितीतरी जास्त आहे. शिवाय त्यांचे क्विंटन डिकॉक, वान डर डुसेन, हेन्रीच क्लासेन, डेव्हीड मिलर, जेनसन खतरनाक फॉर्मात आहेत. तर त्याचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, एनगडी, जेनसन, कोएत्झे धारदार मारा करत आहेत. तर केशव महाराज व तबरेज शम्सीची फिरकीही विरोधी फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेत आहे. 
                तर दुसरीकडे जयमान भारताची फलंदाजी मजबूत असून कितीही पडझड झाली तरी डाव सावरण्यात कोणी ना कोणी बाजी मारून जातोच शिवाय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी भल्या भल्या फलंदाजांच्या उरात घबराट निर्माण करत आहे. त्याचबरोबर फिरकीपटू कुलदिप यादव व रविंद्र जडेजा आपल्या बोटांच्या तालावर फलंदाजांना नाचवत आहे. भारताच्या याच परिपूर्ण गोलंदाजीच्या ताफ्यापुढे कोणताच संघ तिनशे धावांचा टप्पा गाठू शकले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे इतर संघाच्या सामन्यात धावांचे अंबार उभे होत असताना भारतीय गोलंदाजांसमोर हेच धावांचे झरे आटून जातात. त्यामुळे यापूर्वीच्या नेदरलँडविरुद्धचा सामना वगळता द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांच्या रासी ओतल्या आहेत. मात्र तोच टेंपो भारताच्या खतरनाक गोलंदाजांसमोर द. आफ्रिकेचे फलंदाज राखतात का हे बघण्यासाठी जगभरातील कोट्यावधी क्रिकेट शौकिन नजर रोखून बसले आहेत.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com