अखेर एकदाचा भारताचा दक्षिण आफ्रिके विरूध्दचा सामना झाला आणि प्रत्येकाच्या मनात असलेल्या शंकाचं उत्तर मिळालं. पण या सामन्याच्या निकालाने एक प्रश्न मनात येतो की, हा वर्ल्डकप नवा विश्वविजेता ठरविण्यासाठी होतोय की उपविजेता ? कारण यजमान भारतीय संघाचा खेळ ज्या पध्दतीने होत आहे आणि प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला ज्या तऱ्हेने टिम इंडिया लोळवत आहे त्यामध्ये जमीन - अस्मान या पेक्षा मोठं अंतर दिसतंय. मैदान कुठलाही असो, विरोधी संघ कोणताही असो भारताने प्रथम फलंदाजी करो किंवा गोलंदाजी सामन्याचा निकाल एकच असतो तो म्हणजे सामना एकतर्फी व प्रतिस्पर्धी जमिनदोस्त !
टिम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व इतकं आश्चर्यकारक होत आहे की,
भारताविरूध्द खेळणारा संघ सामन्याच्या आधीच निम्मी लढाई हरलेला असतो. आता भारताने साखळीतील नऊ पैकी आठ सामने खेळले असून ते सर्व मोठया फरकाने जिंकले आहेत व शेवटचा सामना तुलनेने कमजोर व नवख्या नेदरलँड विरूध्द होणार असल्याने त्यातील विजया विषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कुठलंही कारण नाही. आता भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणार व चौथ्या क्रमाकांवरील संघाशी भारताचा सामना होणार हे नक्की. मात्र हा संघ कोणता असेल त्यासाठी अकरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
भारताच्या संघातील सर्वच्या सर्व पंधरा खेळाडू उत्कृष्ठ फॉर्मात असून कोणालाही संधी दिली तरी तो आपली भूमिका चपखलपणे बजावतो. त्यामुळे अमूकच खेळाडू संघात हवा असं कोणतंही डोकेदुखी वाढविणारं कारण टिम इंडिया पुढे नाही. इतकंच बघा ना, भारताचा अष्टपैलू खेळाडू व उपकर्णधार हार्दिक पांङ्या हा एका अस्सल फलंदाजांचं कामही करतो व पारंगत वेगवान गोलंदाजाची भूमिकाही यथायोग्य रितीने निभावतो तो
बांगलादेशविरूध्द जखमी होऊन संघाबाहेर गेला तरी संघाच्या कामगिरीवर व मानसिकतेत कुठलाच बदल झाला नाही. परंतु त्याच्या ऐवजी संघात आलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफलातून कामगिरी करून हार्दिकची साधी आठवणही येऊ दिली नाही. उलट शमीच्या शानदार कामगिरीने भारताचे विजय आणखीच सुलभ होत आहेत व प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या काळजाचे ठोके चुकत आहेत. आता तर गमतीने म्हणा किंवा भितीने असे ऐकायला येतंय की, उपांत्य फेरीत भारताविरूध्द आपली लढत होऊ नये म्हणून उपांत्य फेरी गाठू पाहणारे संघ देवाला साकडे घालत आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या नाही केली तर भारतीय गोलंदाज समोरच्या संघाला त्या धावांच्या आसपासही फिरकू देत नाहीत व मोठा विजय मिळवून देतात. जर फलंदाजी करताना थोडीफार पडझड झाली तर कोणताही फलंदाज परिस्थितीचं भान राखून संघाला संकटातून बाहेर काढून विजयी पथावर आणतो. भारताचा प्रत्येक खेळाडू त्याला दिलेला रोल योग्य प्रकारे निभावत असल्याने अगदी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहील्याप्रमाणे टिम इंडियाची कामगिरी होत आहे. हे सर्व घडवून आणण्यात मजबूत खांद्यावर असलेल्या समजूतदार डोक्याचा अनुभवी व सर्वांना योग्य दिशेने घेवून जाणारा कर्णधार रोहीत शर्मा शब्दशः आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहे. मैदानात मग ते फलंदाजी करताना असो वा क्षेत्ररक्षण रोहित केवळ संघाचे हितच बघतो. फलंदाज म्हणून वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाची बाजू कशी भक्कम होईल यावरच त्याचा जोर असल्याने इतर संघ सहकाऱ्यांमध्येही नवीन उत्साह संचारला आहे. आपला कर्णधारच सकारात्म मानसिकता बाळगून असल्याने पराभवाची भितीही कोणाच्याही जवळपास देखील भटकण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.
पूर्वी टिम इंडियात काही खेळाडूंची गटबाजी चालायची त्यामुळे आयसीसी स्पर्धात साखळीत चांगली कामगिरी करूनही संघ निर्णायक सामन्यात हरायचा. मात्र सध्याच्या संघाला बीसीसीय, प्रशिक्षक राहुल द्रविड, त्यांचा सहाय्यक चमू तसेच कर्णधार रोहितने एका भावनिक व एकजूटीच्या धाग्यात गुंफल्याने प्रत्येकाचं मिशन एकच आहे, ते म्हणजे " वर्ल्ड २०२३ " जिंकायचाच व मागील दहा वर्षापासून सुरू असलेला आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचाच. सध्या भारतीय संघ विजेतेपद मिळविण्याचे उद्दीष्ट बाळगून असला तरी त्यांचं थेट अंतिम सामन्यावर नाही तर साखळीतील येईल त्या सामन्यावर फोकस करण्याचं धोरण असल्याने संघाची मानसिकता मजबूत दिसते व ती विजेतेपदाचा करंडक उचलेपर्यंत तशीच राहील अशी आशा करूया.
दृष्ट लागावी अशी कामगिरी टिम इंडियाकडून होत असल्याने इतरांच्या पोटात दुखणार हे जगजाहीर आहे. भारताची चांगली कामगिरी बघून संपूर्ण क्रिकेट जगतात भारतीय संघाची कामगिरी व नियोजनाचे कौतुक होत असताना शेजारी देश पाकिस्तानच्या प्रसार माध्यमात, सोशल मिडीयात काही माजी खेळाडू भारताच्या शानदार कामगिरीला एक नियोजित षडयंत्र आहेत असं समजतात. स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असल्याने भारत स्वतःला हव्या तश्या खेळपट्टया बनवतो, नाणेफेक करताना दोन्ही बाजूला एकच चिन्ह असलेलं नाणं वापरलं जातं, पंचांचे निर्णय भारताच्या फेव्हरमध्येच अधिक असतात. डिआरएस बाबत टिम इंडियाचे अपिलच उचलून धरले जाते व त्याचा निकाल भारताच्या बाजूनेच दिला जातो. स्पर्धेचं वेळापत्रक भारताच्या सोयीचेच बनवले आहे. इतकंच नाही तर भारतीय गोलंदाजांचे चेंडूच कसे काय मोठया प्रमाणात स्विंग व सिम होतात ? आयसीसी / बीसीआय पंचांच्या माध्यमातून वेगळे व विशिष्ट प्रक्रिया केलेले चेंडू टिम इंडियाला देतात. असे अक्कलशुन्य आरोप करत आहेत.
वास्तविक पाहता बीसीसीआय व आयसीसी कुठल्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. तसेच त्या संदर्भात कुठल्याही सहभागी संघांची तक्रार नाही, अगदी पाकिस्तान संघाचीही ! परंतु स्वत: चे राजकिय हित करून घेणे व टिआरपी वाढविण्यात धन्यता मानणारेच जनाधार नसलेले महाभाग अकलेचे तारे तोडत आहेत. उलट या महाभागांनी याच्या त्याच्या समिकरणावर आपले उपांत्य फेरीचं गणित जूळवू पाहणाऱ्या पाकिस्तान संघाची कामगिरी चांगली कशी होईल हे बघितलं असतं तर ते अधिक उचित दिसलं असतं.
यामुळे टिम इंडियाच्या आनंदात कुठलेही विरजण पडणार नाही. मात्र त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये आणखी जीगर, जिद्द व एकजूटता तयार होऊन विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याची शक्ती निर्माण होईल. कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात हे दाखवून देण्याची जबाबदारी आता टिम इंडियावर आहे व ते ती नक्कीच यशस्वीरित्या पार पाडतीलच.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

