shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाईम आऊटच्या निर्णयाने खिलाडूवृत्ती नावाच्या आत्म्याचा गळाच घोटला...!


               क्रिकेटला जंटलमन गेम असे संबोधले जाते, मात्र या खेळात किती जंटल मेन्स व सभ्यता राहिली हा एक चिंतनीय विषय बनला आहे. व्यावसायिकता व एकमेकांवर कुरघोडी करण्याची जीवघेणी स्पर्धा या खेळात घुसली आणि सफेद पोशाखाचे रंगीत जर्सीत परिवर्तन झाले तसेच या खेळात असभ्यताही मोठया प्रमाणात घुसली. यातले काही प्रकार क्रिकेटच्या नियमांचा आधार घेऊन घडले किंवा घडविले जातात. मात्र याचे दुष्परिणाम संपूर्ण क्रिकेट जगताला भोगावे लागतात. क्रिकेटचे नियम हे खेळ निर्विघ्न व प्रामाणिकपणे खेळला जावा यासाठी बनविले आहेत. या दरम्यान खिलाडूवृत्ती हा देखील या खेळाचा आत्मा असतो. त्याचा मात्र येथे गळा घोटण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. याचा प्रत्यय विश्वचषक २०२३ मध्ये सोमवारी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात पुन्हा एकदा आला. 

              बांगलादेश व श्रीलंका या विद्यमान विश्वचषक स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न केलेल्या संंघात एक साखळी सामना खेळला जात होता. तसे बघाल तर या दोन संघात पूर्वीपासूनच सुमधूर संबंध नाहीत. मात्र या सामन्यात जे घडले त्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. श्रीलंका प्रथम फलंदाजी करत होती. त्यांच्या डावातील चोवीस षटके होईपर्यंत सामना निर्धोक सुरू होता. नेमकं पंचविसावे षटक सुरू झाले आणि दुसऱ्या चेंडूवर लंकेचा फलंदाज सदिरा समरविक्रमा बाद झाला आणि त्यानंतर जे काही झालं ते क्रिकेटच्या मानमर्यादेला काळीमा फासणारे असेच होते. नवीन फलंदाज श्रीलंकेचा माजी कर्णधार व या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज खेळायला आला परंतु १५ ते १६ वर्षांचा अनुभव व या दरम्यान असंख्य सामने खेळण्याची शिदोरी गाठीशी असणाऱ्या मॅथ्यूजने एक चुक केली. तो वेळेत मैदानात आला खरा परंतु आपल्या सोबत घेवून यायच्या साहित्यांपैकी प्रमुख असलेले हेल्मेट योग्य व दुरुस्त आहे का नाही याची खातरजमा न करताच आला. प्रत्यक्षात त्याने निर्धारीत वेळच्या आत खेळपट्टीचे यथायोग्य दर्शनही घेतले, बॅटही क्रिझमध्ये ठेवली मात्र स्ट्राईक घेण्यापूर्वी हेल्मेट डोक्यावर चढवताना त्याची स्ट्रीप (पट्टी) तुटल्याची बाब त्याच्या लक्षात आली तेंव्हा त्याने प्रतिस्पर्धी कर्णधार व मैदानी पंच यांना कुठलीही सुचना न देता परस्पर नवीन हेल्मेट मागविले. या कालावधीत बराचसा वेळ वाया गेला. याचा राग मुळात स्वतःच एक असभ्य खेळाडू म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बांगलादेशी कर्णधार साकिब अल हसनला आला. साकिबने पंच राय इमर्सन यांच्याकडे टाईम आऊटच्या नियमांर्तग अपिल केले. पंचानेही साकिबला तो खरोबरच मॅथ्यूज विरोधात दाद मागतो का याची दोन - तीनदा खातरजमा केली त्यानंतरच पंचांनी क्रिकेटचा नियम ४०.१.१ नुसार अँजेलो मॅथ्यूला वेळेची मर्यादा न पाळण्याच्या नियमाखाली टाईम आऊट असे बाद दिले. त्यानंतर मॅथ्यूजने पंच व साकिबला त्याच्या तुटलेल्या हेल्मेटमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे सांगूनही साकिबने त्याचा अडेलतट्टूपणा सोडला नाही. त्यामुळे मॅथ्यूजला मैदान सोडावे लागले आणि स्कोअर बुकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत न घडलेल्या बाद प्रकाराची नोंद झाली.
             वास्तविक खिलाडूवृत्ती हा या खेळाचा प्रमुख गाभा असला तर संबधित खेळाडूंनी आपल्या कडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. चुक मॅथ्यूजची होती त्याची त्याला शिक्षा मिळाली परंतु त्याचा तोटा श्रीलंकन संघाला बसला. कारण मॅथ्यूज फॉर्मात आहे व त्याच्या फलंदाजीचा लाभ श्रीलंकेला मिळाला नाही. परिणामतः श्रीलंकेला अपेक्षित धावसंख्या न गाठता आल्याने पराभवाचा चटकाही सहन करावा लागला.
             क्रिकेटचे नियम मेरिलीबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) बनवते व त्या नियमांचे संचलन आयसीसी द्वारे केले जाते. याच नियमांर्तगत क्रिकेटमध्ये फलंदाजांना अकरा प्रकारे बाद ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्रिफळा, झेलचित, चेंडूला दोनदा टोलविणे, स्वयंचित, पायचित, क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे, धावबाद, यष्टीचित, वेळेची मर्यादा न पाळणे ( टाईम आऊट ), निवृत्त बाद यांचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही प्रकारे फलंदाज कधी ना कधी बाद होऊ शकतो. नियमात याची तरतूद असल्याने त्याचा लाभ घेणारे संघ व चाणाक्ष कर्णधार आहेत. मात्र फलंदाजांनीही वादविवाद होऊन आपण बाद होणार नाही व नियमांचे यथायोग्य पालन करणेही गरजेचे आहे. त्यामुळे खेळ भावना जपली जाईल तसेच या महान खेळाची इज्जत राखता येईल.
              क्रिकेटच्या नियमानुसार बाद झालेल्या किंवा रिटायर्ड झालेल्या फलंदाजानंतर येणाऱ्या नवीन फलंदाजाने एमसीसीच्या नियमानुसार तीन मिनिटाच्या आत मैदानात जाऊन स्ट्राईक घेणे गरजे आहे. मात्र आयसीसीने या स्पर्धेसाठी हि मर्यादा दोन मिनिटे इतकी केली आहे. कोणतीही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या नियमांची माहिती सर्व सहभागी संघांना कळवून त्यांची लेखी समंती मिळाल्यानंतरच आयसीसी संबंधीत स्पर्धेत त्या नियमांची अंमलबजावणी करते. त्यानंतर सर्व संघ व खेळाडूंना ती बंधनकारक असते. एकदा नियम ठरल्यानंतर त्याच्यातून आपल्याला खास सवलत मिळाली याची अपेक्षा कोणत्याही खेळाडूने करणे गैर आहे. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचे त्याने मानूही नये.  
               येथे घडलेल्या या प्रकारानंतर बांगलादेश संघ सोडल्यास प्रत्येकाचे मत होते की, मॅथ्यूज वेळेच्या आत मैदानात आला होता फक्त हेल्मेटच्या तांत्रिक अडचणीमुळे थोडा विलंब झाला. त्यामुळे साकिबने खेळभावनेतून मॅथ्यूजला सवलत दिली जाऊ शकत होती. परंतु साकिबने नियमावर ठाम राहण्याचे ठरविल्याने सगळा विवाद घडला.
             यानंतर जगभरातील क्रिकेट पंडित, तज्ञ, आजी माजी क्रिकेटपटू यांची नियमांवर आधारीत मोठी काथ्याकूट चर्चा झाली. तेंव्हा प्रत्येकाने नियम बरोबर आहे परंतु साकिबने खिलाडूवृत्ती दाखवायलाच हवी होती असे मत मांडले कारण खेळात कधी ना कधी विनाकारण वेळ वाया जातोच. परंतु येथे मॅथ्यूजचा जाणूनबुजून वेळ वाया घालण्याचा उद्देश दिसत नसल्याने साकिब अनेकांच्या टिकेच्या रडारवर आला. त्याचबरोबर सभ्य गृहस्थांच्या खेळात एका असभ्य घटनेची नको असलेली नोंद झाल्याने मनालाही वाईट वाटते.
 
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close