अशा मातीच्या पणत्या
===============
अशा मातीच्या पणत्या
दिवाळीचं दीपदान
कुंभाराचं चाक फिरे
प्रकाश खेळे अंगण
कुंभाराच्या चाकावरी
मातीला मिळे आकार
कौशल्याचा हात फिरे
मिळे मातीचा हुंकार
फिरत्या चाकावरती
कुंभाराचं पोट भरे
मातीच्या ह्या संगतीनं
पणत्यांचा भाव ठरे
मायबाप गुणीजन
करी मातीचं पूजन
लख्ख प्रकाशात नभ
सृष्टीचं आहे सृजन
संस्कृतीच्या प्रकाशात
मानवतेचं आहे धन
लक्ष्मीच्या ह्या पावलानं
घडे माणसाचं मन
दीपावली घरीदारी
देई प्रकाशाचं पर्व
सुखी असू सारे जग
हाच खरा आहे स्वर्ग
कुंभार म्हणे मातीला
तूच आहे माझी माता
देवरूप चाकावर
आनंदलो तूज गाता
माणसानं माणसाला
द्यावी गती आणि नीती
नको गर्व नको स्वर्ग
ठेव शाबूत ही मती
कुंभाराचं हॆ अंगण
माती,पाणी,उजेडाचं
वारा आणि आकाशाचं
गाव पंचमहाभुतांचं
कुंभाराच्या संगतीनं
खेळे देव हा अंगणी
चाकदांडा हातीमाथी
हसे हा दिवे लागणी !
श्रीरामपूर - 9270087640
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

