एरंडोल (ता.प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा भाग म्हणून एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
हा कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी व प्रशासक श्री. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. मेळावा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविला जात असून नागरिक व पथ विक्रेत्यांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या सत्रात भारतीय अन्न पदार्थ व मानांक प्राधिकरण (FSSAI) चे तज्ज्ञ श्री. रामेश्वर राजू यांनी पथ विक्रेत्यांना व्यवसायातील आवश्यक नियम, शासनाकडून मिळणारी प्रमाणपत्रे तसेच स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या वेळी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक श्री. शिवशंकर ठाकूर व कर निरीक्षक श्री. जनार्दन येवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. महेंद्र पाटील यांनी केले तर आयोजनात समुदाय संघटक श्रीमती कुसुम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.



