स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्यांना आदरांजली; उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शन.
पळासदळ (ता. एरंडोल) येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये दि. ३ जानेवारी रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका व स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी मांडली होती.
महाविद्यालयाच्या परंपरेनुसार सावित्रीबाईंच्या लेकींचे प्रतीक म्हणून महिला प्राध्यापिका प्रा. अनिता वळवी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा व समानतेसाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या पिढीने कृतीतून जपावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. जावेद शेख, प्रा. अनुप कुलकर्णी, प्रा. दिग्विजय पाटील यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिग्विजय पाटील यांनी केले.


