पत्रकार दिनी एरंडोल नगर परिषदेत पत्रकारांचा सन्मान; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्ट मत.
एरंडोल | “माझ्या वैचारिक जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा असून समाजाशी प्रामाणिक राहण्याची शिकवण मला पत्रकारितेतून मिळाली,” असे प्रतिपादन एरंडोल नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सत्कार समारंभात केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून एरंडोल नगर परिषदेतर्फे नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल व ज्येष्ठ पत्रकार बी. एस. चौधरी यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
![]() |
| “पत्रकारांची लेखणी ही समाजाची दिशा ठरवते; माझ्या सार्वजनिक जीवनावर त्याचा खोल प्रभाव आहे.” – डॉ. नरेंद्र ठाकूर, लोकनियुक्त नगराध्यक्ष |
अध्यक्षीय भाषणात डॉ. ठाकूर यांनी पत्रकारितेचे समाजातील स्थान अधोरेखित केले. तर प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी “आजच्या धावपळीच्या युगात बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय कमी होत चालली आहे,” अशी खंत व्यक्त करत आशयप्रधान पत्रकारितेची गरज अधोरेखित केली.
यावेळी उपस्थित पत्रकारांचा पेन, डायरी व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ व स्थानिक पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले, सूत्रसंचालन हितेश जोगी यांनी तर आभार एस. आर. ठाकूर यांनी मानले.





