श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील जलसंपदा कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने २०१७ साली करण्यात आलेल्या संयुक्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यात श्रीरामपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा रामचंद्र पाटील यांच्यासह एकूण १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळे संबंधित प्रकरणात दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या सर्व आरोपींना दिलासा मिळाला आहे.
केसच्या हकीकतीनुसार, जलसंपदा विभागाकडून वेळेवर पाणी न सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी संयुक्तपणे श्रीरामपूर येथील जलसंपदा कार्यालयात आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला, कार्यालयात आरडाओरडा झाला तसेच टेबल, खुर्च्या व इतर साहित्याचे नुकसान झाल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला होता.
या घटनेनंतर जलसंपदा विभागाच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 353, 427, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
दीर्घ काळ चाललेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून विविध साक्षीदार तपासण्यात आले तसेच कागदपत्रे सादर करण्यात आली. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली, स्वतंत्र व ठोस पुराव्यांचा अभाव असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. परिणामी, सरकारी पक्ष आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करू शकला नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संशयाचा फायदा आरोपींना देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यातील आरोपींमध्ये रघुनाथदादा रामचंद्र पाटील, बच्चू कडू यांच्यासह कालीदास पंढरीनाथ आपटे, अजय महाराज बारस्कर, बाळासाहेब रामचंद्र पटारे, अनिल प्रकाशराव औताडे, युवराज भाऊसाहेब जगताप, निकुंज कालनाथ मुळे, शंकर वस्त्रराव मुळे, रुपेश विजयचंद्र काले, रमेश माणिक मुळे, शिवाजी लक्ष्मण मुळे, संजय उत्तम गवारे, चांददेव पंढरीनाथ मुळे, भाऊसाहेब नानासाहेब मुळे, परशराम नाथाजी शिंदे, भास्कर परशराम शिंदे व विलास अर्जुन कदम यांचा समावेश होता.
या प्रकरणात आरोपी क्रमांक २ व ४ यांच्या वतीने अधिवक्ता पांडुरंग औताडे, आरोपी क्रमांक ६ व ७ यांच्या वतीने अधिवक्ता घोडेपाटील, तर उर्वरित आरोपींच्या वतीने अधिवक्ता बी. बी. मुठे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना अधिवक्ता शेखर गोर्डे व अधिवक्ता के.के. दहातोंडे यांनी सहकार्य केले. यांनी सहकार्य केले न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

