कुटुंबव्यवस्थेचा कणा असलेल्या 'गृहिणी'च्या निःस्वार्थ श्रमाचे मोल पैशात मोजणे अशक्यच; 'तिच्या' त्यागाला हवाय केवळ सन्मानाचा आणि आदराचा स्पर्श -लेखिका : आरती भणगे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः
जेथे स्त्रियांची पूजा होते किंवा स्त्रियांना सन्मान देतात, तेथे देवता निवास करतात. समाजात वावरताना कसं वागावं याचे शिक्षण शाळेत दिले जात नाही, तर ते अनुभवातून व संस्कारातून मिळते. गुणात्मक वाढीबरोबर संस्कार महत्त्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही आणि हे संस्कार कुटुंबातूनच सुरू होतात.
घर सांभाळणे हे सामान्य माणसांच्या कल्पनेपेक्षा महान व अवघड काम आहे. नवविवाहित महिला लग्नानंतर सासरच्या घरात प्रवेश करते तेव्हा सर्वच नवीन असतं. लाडकाचे माप ओलांडून नवरी सासरच्या घरात प्रवेश करते. नवरी सासरी समृद्धी व आनंद घेऊन येते असं म्हटलं जातं. नवी नवरी ही लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळेही ही रीत पार पाडली जाते. काही महिन्यांत किंवा वर्षात हीच नवरी बाळाला जन्म देऊन आई बनते. आई झाल्यानंतर देवदत्त अशी माया, ममता तिच्या अंगी प्राप्त होते.
घराचं घरपण टिकवणारी 'ती'
घर सांभाळणे ही देखील एक खूप मोठी कला आहे. त्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम घ्यावे लागतात. घरातील सर्वांच्या मागण्या पूर्ण करणे, मुलं सांभाळणे, मुलं लहान असल्यास संगोपन करणे, त्यांचा अभ्यास घेणे, ज्येष्ठ मंडळींची सेवा, सुश्रुषा, पथ्यपाणी करणे, सणवार, व्रतवैकल्य, उपास-तापास, पूजापाठ सांभाळणे, येणारे पाहुणे, आजारपण असल्यास नातेवाईकांची सेवा, वेगवेगळ्या ऋतूंमधील वेगवेगळे साठवणीचे पदार्थ बनवणे, घराची स्वच्छता, टापटीप व दररोजचा नाष्टा, स्वयंपाक इत्यादी सर्व कामे घर सांभाळणारी महिला करत असते.
या सर्व जबाबदाऱ्या ती लीलया पार पाडत असते. घराचं घरपण टिकवणे, मुलांवर चांगले संस्कार करणे, वडिलधाऱ्यांची सेवा करण्यासाठी ती सातत्याने राबत असते. स्कंदमाता प्रमाणे प्रेमाचा वर्षाव करणारी ती गृहिणी असते. 'अन्नपूर्णा' म्हटले तर ती पालनपोषण करणारी आहे आणि प्रसंग आला तर दुर्गेचे रूपही ती धारण करते. साध्या झोपडपट्टीत जरी ठेवले तरी स्वर्गसुख मिळवून देणारी ही गृहिणीच आहे.
'ती'ची अनंत रूपे
प्रत्येक नात्याला जपणारी आणि सर्वांना स्वीकारणारी नायिका म्हणजेच घर सांभाळणारी गृहिणी. जीवन प्रवासात निरपेक्ष होऊन ती सत्कर्म करत राहते आणि तिने केलेले हे सत्कर्मच चांगल्या रूपाने उभे ठाकतात व परमसुख देऊन जातात. घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान म्हटले तर सर्वात प्रथम आठवते ती जन्म देणारी आई, जिवापाड माया करणारी ताई, कधी आजी तर कधी मावशी आठवते. कारण 'ती'ची रुपे अनंत आहेत.
आई व वडील हे एकाच रथाची दोन चाके आहेत. परंतु बहुतेक ठिकाणी वडील नोकरी किंवा व्यवसाय याद्वारे अर्थार्जन करतात. ८ ते १० तास त्यांना नोकरी, व्यवसायात वेळ द्यावा लागतो. म्हणूनच घरातील सर्व कामांची जबाबदारी ही प्रामुख्याने महिलांचीच असते. घर म्हटले की काय एक काम नसते? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची कामे चालूच असतात. घरातील सर्वच कामे व जबाबदाऱ्या ती निमूटपणे पार पाडते. 'अतिथी देवो भव' या उक्तीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत करणे, पाहुणचार करणे यामध्येही घर सांभाळणाऱ्या महिलेचे मोठे योगदान असते.
> बहुआयामी व्यक्तिमत्त्व
> घर सांभाळणारी महिला,
> तावून सुलाखून निघूनही खट्याळ दिसणारी,
> सासर-माहेर यामधील दुवा जपणारी,
> नाविन्याचा शोध घेत सांस्कृतिक वारसा जपणारी,
> सणवार-वाढदिवसाचा वारसा जपणारी,
> प्रत्येक प्रसंगाला हसतमुख सुंदर रांगोळी रेखाटणारी,
> शांततापूर्वक संस्कृती जपणारी...
आयुष्यात येणाऱ्या अनेक आव्हानांना पेलून मोठ्या खूबीने माणसं जोडत आपले आयुष्य रंगवणाऱ्या बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजेच घर सांभाळणारी महिला होय.
अनपेड श्रमाशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही
घर सांभाळणाऱ्या या महिलांमध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक बळही असणे आवश्यक असते. गृहिणींनी काम करणे बंद केले तर सर्वात आधी 'कुटुंब' नामक संस्था कोलमडेल. इतकंच नाही तर खाजगी क्षेत्रापासून सरकारी क्षेत्रापर्यंतची सर्व कामे बंद होतील. त्यामुळे हे मान्य करावंच लागेल की 'अनपेड' (विनामोबदला) श्रमाशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही.
तिने प्रेमाने केलेली ही अनेक कर्तव्ये पाहिली तर त्याचे मोजमाप पैशात कधीच होणार नाही. कारण त्यामागे माया, ममता आणि अथांग प्रेमभावना असते. ही भावना कुठे डी-मार्ट ला किंवा इतर कोणत्याही दुकानांमध्ये विकत मिळणार नाही. म्हणूनच मी अभिमानाने म्हणते की, घर सांभाळणाऱ्या महिलांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे!
-लेखिका आणि शब्दांकन
आरती भणगे

