ईशान मलिंगासह इतर गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला. शनिवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या राजस्थानने वैभव सूर्यवंशीचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत सहा बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबादने १८.३ षटकांत पाच गडी गमावून २२९ धावा केल्या आणि सामना जिंकला.
हैदराबादचा यशस्वी धावांचा पाठलाग
आयपीएलच्या इतिहासात याच मैदानावर हैदराबादने केलेला हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे. यापूर्वी, सनरायझर्स हैदराबादने २०२३ मध्ये याच मैदानावर राजस्थानविरुद्ध २१५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले होते. २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादचा हा पाचवा विजय असून, आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धचा हा त्यांचा सलग सहावा विजय आहे.
हैदराबाद तिसऱ्या स्थानावर
सलग चार विजयांसह सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकविले आहे. त्यांचे आता १० गुण असून नेट रन रेट +०.८१५ आहे. दरम्यान, आपल्या आठ सामन्यांपैकी तीन सामने गमावलेला राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहे. मात्र, त्यांच्याकडेही केवळ १० गुण आहेत. सध्या, शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पंजाब किंग्स १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गतविजेता आरसीबी १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ईशान आणि अभिषेकची शतकी भागीदारी
२२९ धावांचे लक्ष्य गाठताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड पाच चेंडूंमध्ये केवळ सहा धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ५५ चेंडूंमध्ये १३२ धावांची भागीदारी केली. अभिषेकने २९ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. ईशानने ३१ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि तीन षटकारांसह ७४ धावांची दमदार खेळी केली.
अभिषेक आणि ईशान परतल्यानंतर, हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघाला सावरण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ३१ चेंडूंमध्ये ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नितीश १८ चेंडूंमध्ये ३६ धावांवर बाद झाला. क्लासेनने २४ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकारासह २९ धावा केल्या. सलील अरोरा आठ धावांवर तर अनिकेत वर्मा एका धावेवर नाबाद राहिले. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर फरेराने एक बळी मिळाला.
राजस्थानची सर्वोच्च धावसंख्या
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २० षटकांत सहा गडी गमावून २२८ धावा केल्या. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. राजस्थानने पंजाब किंग्सचा विक्रम मोडला. आयपीएल २०२५ मध्ये याच मैदानावर खेळताना पंजाबने पाच गडी गमावून २१९ धावा केल्या होत्या, जी या सामन्यापूर्वी या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या होती. पहिल्या डावातील ही राजस्थानची सर्वोच्च धावसंख्या आहे. राजस्थानने २०२२ मध्ये दोन गडी गमावून केलेल्या २२२ धावांचा स्वतःचाच विक्रम मोडला. आयपीएलच्या इतिहासातील ही राजस्थानची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने शानदार शतक झळकवत एक उत्कृष्ट कामगिरी केली. पुरुषांच्या टी-२० मध्ये सर्वात कमी डावांमध्ये चार शतके झळकाविणारा फलंदाज बनून त्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
वैभवने मोठी कामगिरी केली
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल सामन्यात, १५ वर्षीय वैभवने ३६ चेंडूंमध्ये आपले दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले. यापूर्वी त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकविले होते. पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये चार शतके करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने २६ टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये चार शतके पूर्ण केली. त्याने उस्मान खान (३३ डाव), साई सुदर्शन (७२ डाव), ख्रिस गेल (७७ डाव) आणि मायकल क्लिंगर (८८ डाव) यांना मागे टाकले.
वैभवचे विक्रम
या सामन्यात वैभवच्या बॅटने धुमाकूळ घातला. त्याने २७८.३७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ८१ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तीन वेळा १५ चेंडूंमध्ये ५० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याव्यतिरिक्त, वैभवने १,००० टी२० धावा देखील पूर्ण केल्या. त्याने ४७३ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला आणि १,००० टी२० धावा पूर्ण करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला. वैभव ४० पेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन शतके करणारा पहिला फलंदाजही ठरला.
कर्णधार परागची बॅट शांत राहिली.
शेवटच्या षटकांमध्ये डोनोव्हान फरेराने १६ चेंडूंमध्ये ३३ धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, कर्णधार रियान पराग पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला केवळ सात धावा करता आल्या. शिमरॉन हेटमायरला १० चेंडूंमध्ये केवळ ११ धावा करता आल्या. रवींद्र जडेजा चार धावांवर नाबाद राहिला, तर जोफ्रा आर्चर दोन धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजीमध्ये, हैदराबादकडून ईशान मलिंगाने दोन बळी घेतले, तर प्रफुल्ल हिंगे, पॅट कमिन्स आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेता आला.
आधीच फलंदाजांची मजबूत फळी असलेल्या सनरायझर्सची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन कर्णधार व जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सच्या आगमनाने धारदार बनली आहे. शिवाय इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केल्याने त्यांच्या फलंदाजांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. आता गुणतालिकेतही त्यांनी भरारी मारल्याने त्यांना आणखी चांगली कामगिरी करायला बळ मिळेल हे निश्चित.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

