शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गाव परिसरातील जवाहरवाडी येथे राहणाऱ्या एका चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेश बर्डे यांची कन्या ईश्वरी बर्डे (इयत्ता दुसरी) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरी ही घराजवळील शेतात खेळत असताना अचानक तिला सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
कुटुंबीयांनी तातडीने तिला लोणी येथे हलविले; मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान ईश्वरीची प्राणज्योत मालवली. एका निरागस चिमुकलीच्या अकाली मृत्यूने बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्येही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
ईश्वरी ही अभ्यासात हुशार आणि सर्वांची लाडकी मुलगी म्हणून ओळखली जात होती. तिच्या अकाली जाण्याने जवाहरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी बर्डे कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नोंदविला आहे.

