पोलिसांना तातडीने माहिती देत शोधकार्यात मदत; तन्वीची भेट घेऊन विजय दादांनी केला सन्मान — ‘मुलांवर राग नको, प्रेम द्या’ असा पालकांना संदेश
ठाणे प्रतिनिधी :
ठाणे येथील वडारवाडी परिसरातील ११ वर्षीय तन्वी शरद पवार ही मुलगी सुमारे नऊ दिवसांपासून बेपत्ता झाल्याने तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.
तन्वीचा सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय अत्यंत अस्वस्थ झाले होते.ही बाब वीर वडार एकता फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. विजय दादा गोरे यांनी डीसीपी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून तन्वी बेपत्ता असल्याची माहिती देत तिचा तातडीने शोध घेण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य गतिमान करून तन्वीचा शोध घेण्यात यश मिळवले.
तन्वी सुखरूप सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. या प्रकरणात विजय दादा गोरे यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि पुढाकाराचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले.
दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी विजय दादा गोरे यांनी तन्वीची प्रत्यक्ष भेट घेत तिच्या पाठीवर मायेने हात ठेवून तिला धीर दिला. तसेच तिचा सन्मानपूर्वक सत्कार करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तन्वीला समज देताना विजय दादा गोरे म्हणाले की, “बेटा, यापुढे रुसून घरातून कुठेही जाऊ नकोस. मन लावून शिक्षण घे, आई-वडिलांची सेवा कर. भविष्यात शिक्षिका हो आणि समाजात जागृती करण्याचे काम कर. कोणत्याही मुलीने आई-वडिलांना सोडून रुसून घराबाहेर जाऊ नये, यासाठी तू स्वतः पुढे येऊन इतर मुलींमध्येही जनजागृती कर.”
तसेच तन्वीच्या आई-वडिलांनाही त्यांनी महत्त्वाचा संदेश देत, “मुलांना रागावण्यापेक्षा त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. मुलांना आपुलकी आणि आधार द्या. कुटुंबात प्रेमाचे वातावरण ठेवा,” असे आवाहन केले.
या प्रसंगी विजय दादा गोरे यांच्या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. एखाद्या कुटुंबावर संकटाची वेळ आली असताना संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे आणि कुटुंबाला आधार देणे, ही सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी ब्रम्हा धोत्रे ,पत्रकार रमेश जेठे सर, रमेश धोत्रे, नागेश चौगुले राजाभाऊ घायवळ, विजय आंबेकर, अविनाश आरोटे पाटील यांच्यासह वीर वडार एकता फौंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.तन्वी सुखरूप घरी परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. या घटनेतून पालकांनी मुलांशी संवाद, प्रेम आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
०००

