शिर्डीत 'व्हिजनरी' पर्वाची सुरुवात; गाडीलकर साहेबांच्या कामावर साईभक्त खूश
नगर प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील सामाजिक संघटना असलेल्या 'साईश्रद्धा प्रतिष्ठान, शिर्डी शहर' च्या वतीने नूतन वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) वितरण उत्साहात सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व पत्रकार तुषार महाजन यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.) मा. श्री. गोरक्षजी गाडीलकर साहेबांची भेट घेऊन त्यांना दिनदर्शिकेची प्रत सप्रेम भेट दिली. यावेळी गाडीलकर साहेबांच्या कार्यकाळात शिर्डीत घडलेल्या सकारात्मक बदलांचे आणि त्यांच्या 'व्हिजनरी' नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.
साईचरणी भक्तांचा उच्चांकी प्रतिसाद,
साईश्रद्धा प्रतिष्ठानने केवळ दिनदर्शिका प्रकाशित न करता त्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा व जनसंपर्काचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. दिनदर्शिका स्वीकारताना गाडीलकर साहेबांनी उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. श्री. गाडीलकर यांच्या दूरदृष्टीने आणि धाडसी निर्णयांमुळे संस्थांनचा कारभार केवळ पारदर्शकच झाला नाही, तर जगभरातील साईभक्तांना शिर्डीकडे आकर्षित करण्यात त्यांना मोठे यश आले आहे. त्यांच्या कार्यकाळात शिर्डीमध्ये भाविकांच्या गर्दीने नवा उच्चांक गाठला आहे.
सोशल मीडिया आणि ‘कनेक्ट’चा नवा अध्याय,
गाडीलकर साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून संस्थानच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. काळाची पावले ओळखून त्यांनी सोशल मीडिया आणि 'रिल्स'चा प्रभावी वापर करत साईबाबांचा प्रचार आणि प्रसार जागतिक पातळीवर नेला आहे. नुकतेच पार पडलेले 'सोशल मीडिया संमेलन' हा त्यांच्या कल्पकतेचा एक उत्तम नमुना ठरला. तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधणे असो किंवा ट्रस्टच्या कार्यक्रमांमध्ये स्वतः उपस्थित राहणे असो, त्यांच्या या 'कनेक्ट'मुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण आहे.
साहसी निर्णय आणि पादुका दर्शन सोहळा,
मंदिरातील अनेक वर्षांच्या जुन्या पद्धतींमध्ये साहसी परिवर्तन घडवून आणणारे निर्णय घेण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. विविध राज्यांमध्ये 'साई पादुका दर्शन' सोहळा आयोजित करून त्यांनी साई भक्तीचा जागर देशभरात पोहोचवला. ट्रस्टच्या संपत्तीचे योग्य नियोजन आणि वृद्धी करण्यासोबतच सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेमुळे त्यांचे प्रशासन कौतुकास पात्र ठरले आहे.
त्यांच्या या कार्यपद्धतीबद्दल बोलताना पत्रकार तुषार महाजन म्हणाले की, गाडीलकर साहेबांचे अनेक साहसी आणि परिवर्तन घडविणारे निर्णय शिर्डीतील गर्दीच्या या उच्चांकासाठी अत्यंत लाभदायक ठरले आहेत. एका कार्यक्षम अधिकाऱ्याच्या कामाला शिर्डीकर म्हणून आम्ही ५ पैकी ५ गुण देत असून, यापुढेही अशीच साईसेवा त्यांच्या हातून घडत राहावी.
श्री. गाडीलकर यांच्या रूपाने शिर्डीला एक अभ्यासू आणि प्रयोगशील अधिकारी लाभल्याची भावना सध्या भक्तांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. यावेळी साईश्रद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

