एरंडोल:- येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिगंध संचलित फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूल मध्ये “बालरंग 2026” वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले. बाल शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी जळगाव येथील प्रमुख वक्ते डॉ. गौरव पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मुलांच्या बोलण्याच्या विकासासाठी पालकांनी अधिक वेळ द्यावा तसेच मोबाईलच्या वाढत्या वापरापासून मुलांना दूर ठेवणे किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खडके विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश पाटील, कृषी अधिकारी एस. टी. पाटील, केंद्रप्रमुख नारायण बोरसे, अश्विनीकुमार नेत्रालयचे अध्यक्ष संजय साळुंखे, तसेच फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष ललित पाटील व स्वप्निल बोरसे उपस्थित होते. यावेळी स्थानिक शिक्षणतज्ज्ञ, पालकवर्ग व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, बालगीत, कविता, नृत्यनाटिका व लघुनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध रंगीबेरंगी वेशभूषेत मुलांनी सादर केलेले कार्यक्रम पाहून पालक व शिक्षक मंत्रमुग्ध झाले.
शाळेच्या प्राचार्या नूतन बोरसे मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “बालरंग” हे नावच मुलांच्या आयुष्यातील आनंद, रंगत आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये धाडस, मैत्रीभाव आणि सांस्कृतिक जाणीव विकसित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व उपस्थितांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे एरंडोलच्या शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ झाले.



