अहिल्यानगर -पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजित मुकिंदा चव्हाण (रा. निमजेवाडी, घोटवी, ता. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पीडिताने पोलिसांत फिर्याद दिली असून घटना मार्च 2019 पासून 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत अहिल्यानगर- दौंड रस्त्यावरील बाबुर्डी बेंद ता. अहिल्यानगर शिवारातील हॉटेलमध्ये घडली आहे. रणजित चव्हाण याने फिर्यादीचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर मार्च 2019 पासून ते फेब्रुवारी 2026 या प्रदीर्घ कालावधीत त्याने पीडितेचे खासगी फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तेच फोटो व व्हिडीओ पीडितेच्या घरच्यांना दाखविण्याची भीती दाखवली. याचा गैरफायदा घेत, संशयित आरोपीने वारंवार फिर्यादीच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले.अखेर पीडिताने तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे पुढील तपास करत आहेत.

