shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

AK-47 रायफलसह फोटो व्हायरल; कोपरगावातील तरुणावर पोलिसांची चौकशी, AI कोनातून तपास सुरू...

कोपरगाव (प्रतिनिधी) – शहरातील तौफीक बागवान या युवकाचा कथितपणे AK-47 रायफल व कंबरेला पिस्टलसह दिसणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ हालचाल करत त्याच्या निवासस्थानी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सदर युवकाने आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर हा फोटो अपलोड केला होता. काही वेळातच हिंदुत्ववादी विचारसरणीच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.


प्राथमिक तपासात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फोटो हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्याबाबत तांत्रिक पडताळणी सुरू आहे. तसेच फोटोमधील शस्त्रे – AK-47 रायफल व पिस्टल – ही खरी (ऑरिजनल) आहेत की बनावट किंवा डिजिटल एडिटिंगचा भाग आहेत, याबाबतही सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, तौफीक बागवान याचे श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक ०२ मध्येही येणे-जाणे असल्याची माहिती समोर येत आहे. तो सध्या घरी उपलब्ध नसल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही पोस्टमध्ये या प्रकरणाचा संबंध इतर गुन्हेगारी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, पोलिसांनी अशा अप्रमाणित व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

बेकायदेशीर शस्त्रांचे प्रदर्शन, त्यासंदर्भातील फोटो/व्हिडिओ प्रसारित करणे किंवा समाजात भीती व दहशत निर्माण होईल अशा स्वरूपाची सामग्री सोशल मीडियावर प्रसारित करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात. तसेच खोटे किंवा भ्रामक (AI-निर्मित) फोटो प्रसारित करून जनतेत संभ्रम निर्माण केल्यास संबंधितांवर भारतीय न्यायसंहितेतील फसवणूक, अफवा पसरवणे व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे कलमांन्वये कारवाई होऊ शकते.
पुढील तपास कोपरगाव पोलीस करत असून, सत्यस्थिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
close