श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील बेलापूर रोड कमानी परिसरात राहणारे गवंडी कामाचे मुकादम अर्जुन शरणागत यांनी खाजगी सावकारांच्या कथित छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित सावकारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत अर्जुन शरणागत हे बांधकाम क्षेत्रात गवंडी मुकादम म्हणून कार्यरत होते. त्यांच्या ताब्यातील मजुरांना आठवड्याच्या मानधनाचे वेळेवर भुगतान करण्यासाठी त्यांनी काही व्यक्तींंकडून व्याजाने रक्कम उचलली होती. सदर कर्जाची परतफेड करत असतानाही संबंधित खाजगी सावकारांकडून वारंवार अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत होती. तसेच सतत तगादा व मानसिक छळ होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मयताने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत “मला माफ करा, कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे” असा उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी मयताची पत्नी विद्या शरणागत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खाजगी सावकार सोमनाथ लाड, शंकर लाड व किशोर गंगावणे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
कायदेशीर बाजू :
कर्जवसुलीसाठी कोणत्याही व्यक्तीवर मानसिक अथवा शारीरिक दबाव टाकणे, धमकी देणे किंवा छळ करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (Abetment of Suicide) गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते.
टीप : नागरिकांनी बेकायदेशीर सावकारीपासून दूर राहून, गरज असल्यास अधिकृत बँकिंग व वित्तीय संस्थांचा पर्याय निवडावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
००००

